पुणे, १४ ऑक्टोबर २०२५: वाडिया कॉलेजमधील पोस्टर वादानंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेवर (अभाविप) थेट निशाणा साधला. “ते सत्तेत असले तरी आम्ही घाबरणार नाही. त्यांनी बोट घातलं, तर आम्ही हात घालू. ॲक्शनला रिअॅक्शन मिळणारच,” असा कडक इशारा त्यांनी दिला.
वाडिया कॉलेजमध्ये अभाविपकडून मनविसे व इतर दोन संघटनांच्या बॉयकॉटची पत्रके लावण्यात आली होती. त्याविरोधात मनविसे कार्यकर्त्यांनी सदाशिव पेठेतील अभाविपच्या मुख्य कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलन केले होते. या प्रकरणी मनविसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर अमित ठाकरे यांनी आज पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली.
त्यावेळी ठाकरे म्हणाले, “आम्ही कायदा मोडू इच्छित नाही, पण तो सगळ्यांसाठी समान असायला हवा. जर आमच्या कार्यकर्त्यांवर कारवाई होत असेल, तर ज्यांनी बॉयकॉटची पोस्टर लावली त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. सीसीटीव्ही फुटेज तपासले जाईल. जर ती मुलं अभाविपचीच निघाली, तर त्यांची सर्व कार्यालयं बंद करावी लागतील.”
ते पुढे म्हणाले, “जर आम्ही उद्या एखादं पोस्टर लावून कोणाला बॉयकॉट केलं, तर ते योग्य ठरेल का? या पुढे आमचं उत्तरही तसंच मिळेल — जशी ॲक्शन तशी रिअॅक्शन!”
पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीविषयीही ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. “पुण्यात ड्रग्स, महिलांवरील अत्याचार, लहान मुलांमध्ये दारू आणि गुन्हे वाढले आहेत. पोर्शे अपघातासारखी प्रकरणं अजूनही शहर हादरवत आहेत. या परिस्थितीवर फक्त पोलीस प्रशासनच नियंत्रण आणू शकतं. अठरा वर्षांखालील मुलांना ड्रग्स आणि दारू पुरवणाऱ्यांची आम्ही संपूर्ण यादी तयार करणार आहोत,” असा इशारा त्यांनी दिला.
अमित ठाकरे यांच्या या तीव्र वक्तव्यानंतर पुण्यातील विद्यार्थी संघटनांमधील संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

More Stories
मतदान करा, हेच खरे आवाहन ; अभिनेते प्रवीण तरडे यांचे मतदात्यांना आवाहन
अभिनेता सुबोध भावे यांनी पुणेकरांसोबत मतदानाचा हक्क बजावला
शाई पुसून मतदानाचा गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणार नाही