बारामती, दि: २८/०१/२०२५: ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, संचलित शारदाबाई पवार महिला आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळ, रोशीनी ॲक्शन फॉर इम्पॅक्ट फाउंडेशन, नागरिक विकास अध्ययन संस्थान पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने २७ ते ३० जानेवारी या कालावधीत शारदानगर येथे स्वयंसिद्धा युवती संमेलन संपन्न होत आहे.
काल सोमवारी या स्वयंसिध्दा युवती संमेलनाचे उद्घाटन झाले. आज संमेलनाचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात सांगलीच्या पोलीस उपअधीक्षक मा. राजश्री पाटील, मिसेस महाराष्ट्र, उपविजेती व माजी विद्यार्थिनी मा. प्रतीक्षा जगताप, कॉटन व्हिलेजच्या संस्थापक स्वाती खुराणा यांच्या मुलाखती झाल्या.
मुलाखतीत राजश्री पाटील यांनी स्वतःचा प्रवास सांगितला. त्या म्हणाल्या,” माझे वडीलच मला प्रेरणास्थान होते. सातारा जिल्ह्यातील शेटफळे सारख्या खेडेगावातून माझा प्रवास सुरू झाला, ग्रामीण भागातून आल्यामुळे इंग्रजी विषय चांगला नव्हता, पण मी त्या विषयाची तयारी चांगली केली, इंजीनिअरिंग पूर्ण केले, स्पर्धा परीक्षेची चांगली तयारी केली, पास झाले. आज मी पोलीस उपअधीक्षक या पदावर काम करत आहे. माझ्या कुटुंबातील सर्वजण मला सहकार्य करतात. वडिलांचं स्वप्न मी पूर्ण केलं. विद्यार्थिनींनो अभ्यासाच्या काळात अभ्यास करा. इतरांना मदत करा. आपल्या कामावर विश्वास ठेवा. गरजेप्रमाणे पैसे वापरा. विचार चांगले ठेवा. पेहराव चांगला ठेवा. सोशल मीडियापासून दूर राहा. स्वतःचं अस्तित्व निर्माण करा आणि स्वतःचा उत्पन्न स्रोत तयार करा.”
मुलाखतीच्या प्रश्नांना उत्तर देताना मा. प्रतीक्षा जगताप म्हणाल्या, “माझं बालपण नगर जिल्ह्यातील पळवे या गावात गेले. बारावी पर्यंतचे शिक्षण शिरूरला झाले. मी मराठी माध्यमाच्या शाळेत शिकले. शारदानगरला बीसीए पूर्ण केले. कॉलेजच्या तिसऱ्या वर्षाला असताना माझे लग्न झाले. कॉलेजमध्ये असताना नाटकांमध्ये काम केले. स्टेज मिळाले आणि आत्मविश्वास निर्माण झाला. माझे सासू-सासरे आजही दुसऱ्याच्या शेतात काम करतात. लग्नानंतर सहा वर्षांनी मी ‘मिसेस महाराष्ट्र’ झाले. इंस्टाग्राम वरील रील बघून मी ऑडिशनचा फॉर्म भरला. माझी निवड झाली. निवड झाल्यानंतर चालण्या, बोलण्याचा खूप सराव करावा लागला. त्यातून मग माझी मिसेस महाराष्ट्र म्हणून निवड झाली. जग खूप वेगाने पुढे चालले आहे. आपल्या जीवनाला वेग द्या. अनेक घटना प्रसंगातून मी शिकत गेले. आत्मविश्वास असेल तर अनेक गोष्टी जमतात. सतत स्वतःला अपडेट करत राहा. शिकणं थांबवू नका. सोशल मीडियाचा उपयोग फक्त शिकण्यासाठी करा.”
कॉटन व्हिलेजच्या संस्थापक मा. स्वाती खुराणा यांनी आपल्या व्यवसायातील अनुभव सांगितले, त्या म्हणाल्या,” माझा जन्म मुंबईत झाला. बालपण पुण्यात गेले. शिक्षण पुण्यात झाले. माझी आजी हातगाड्यावर ब्लाऊजपीस विकायची, पडत्या काळात तिनेच आम्हाला संभाळले, त्यामुळे माझी प्रेरणा माझी आजी आहे. तिच्या व्यवसायातून प्रेरणा घेऊन मी माझा व्यवसाय सुरू केला.
मला लहानपणापासूनच कपड्यांचे वेड होते. कोणत्याही प्रकारचं ट्रेनिंग, शिक्षण न घेता मी माझा व्यवसाय सुरू केला व यश मिळवले. २००८ साली मी व्यवसाय सुरू केला. अनेक चांगले वाईट अनुभव आले. अनुभवातूनच आपण शिकत जातो. वाईट अनुभवाशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. आपल्या व्यवसायात सातत्य ठेवा. स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा. व्यवसायात सर्वात
महत्त्वाची निर्णय प्रक्रिया असते, योग्य वेळी योग्य निर्णय घेतला की नफा होतो, निर्णय चुकला की तोटा होतो. २०२१ मध्ये मी माझं पहिलं दुकान सुरू केलं. व्यवसायात आज आमचे स्वतःचे प्रिंटिंग आहे, ४० टेलर व ८० कामगार आहेत. छोट्या कपड्यांच्या चिंध्यांपासूनसुद्धा नवीन वस्तू तयार करतो. व्यवसायात आत्मविश्वास खूप महत्त्वाचा आहे, तो वाढत गेला की व्यवसाय वाढत जातो.”
सदर संमेलन यशस्वी करण्यासाठी संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार, विश्वस्त-सचिव, सुनंदा पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे, संस्था समन्वयक प्रशांत तनपुरे, संस्थेच्या एचआर हेड गार्गी मॅडम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकुमार महामुनी, उपप्राचार्य, डॉ. मोहन निंबाळकर, विज्ञान शाखाप्रमुख डॉ. परिमीता जाधव, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग विशेष परिश्रम घेत आहेत. स्वयंसिद्धा युवती संमेलनाचे समन्वयक प्रा. राजकुमार देशमुख, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. रोहिदास लोहकरे, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन प्रा.डॉ. अश्लेषा मुंगी व यांनी केले, आभार प्रदर्शन प्रा. रोहिदास लोहकरी यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
Pune: कृषी क्षेत्रात एआय वापरासाठी या आर्थिक वर्षात ५०० कोटी रुपये: उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा
पुणे: महावितरणला पावसाचा तडाखा; ९२४ खांब जमीनदोस्त
ऑनलाईन वीजबिल भरणाऱ्या ३०५ वीजग्राहकांना मिळाले स्मार्टफोन अन् स्मार्टवॉच