पुणे, दि.१७/०३/२०२३- कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी उपकेंद्र आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन शैक्षणिक धोरण २०२० च्या परिप्रेक्ष्यात भारतीय ज्ञान परंपरा या द्विदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन दि. १७ व १८ मार्च रोजी विद्यापीठात करण्यात आले आहे. या चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभात अध्यक्षस्थानी कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रा. मधुसूदन पेन्ना होते. प्रमुख अतिथी या नात्याने प्रख्यात प्राच्यविद्यातज्ज्ञ मुंबई आयआयटीचे प्रा. रामसुब्रमण्यन् उपस्थित होते. बीजभाषक म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या सुकाणू समितीचे अध्यक्ष डाॅ. नितीन करमळकर तर सारस्वत अतिथी या नात्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डाॅ. संजीव सोनवणे उपस्थित होते. या चर्चासत्राचे संयोजक संस्कृत व प्राकृत विभागाचे प्रमुख प्रा. देवनाथ त्रिपाठी, चर्चासत्राचे समन्वयक म्हणून ककासंवि रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डाॅ. दिनकर मराठे, डाॅ. दिनेश रसाळ आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
सर्वसमावेशक जीवनशैली व विचार प्रदान करण्याची क्षमता भारतीय ज्ञानपरंपरेत आहे. पुढील पीढीपर्यंत ते पोहचविणे हे आपले कर्तव्य आहे असे मत प्रा.रामसुब्रमण्यन यांनी व्यक्त केले.
डाॅ. नितीन करमळकर यांनी राष्ट्रीय शिक्षा धोरणाच्या अंमलबजावणीकरिता महाराष्ट्रात सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. तसेच भारतीय ज्ञान परंपरचे अभ्यासक्रम निर्माण करण्याकरिता संस्कृत विद्यापीठाने पुढाकार घ्यावा असेही ते यावेळी म्हणाले.
प्रा. मधुसूदन पेन्ना यांनी प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरेचे महत्त्व पटवून देऊन या विषयाची प्रासंगिकता स्पष्ट केली.
द्विदिवसीय चालणा-या या चर्चासत्रात भारतभरातून १२० हून अधिक विद्वान् सहभागी झाले आहेत. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये भारतीय ज्ञान परंपरा कशी अनुस्यूत करता येईल, त्याचे उपयोजन विविध अभ्यासक्रमात कसे करता येईल यासंदर्भातील विविध पैलूंवर विविध विद्वान् आपली मते मांडणार आहेत.
निमंत्रित संशोधक विविध सत्रांमध्ये आपले संशोधननिबंध सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. देवनाथ त्रिपाठी यांनी केले तर उद्घाटन सत्राचे संचालन डॉ. मुग्धा गाडगीळ यांनी केले व आभार डॉ. दिवाकर मोहन्ती यांनी मानले.
More Stories
दैनिक भारत डायरीचे संपादक अशोक अग्रवाल यांचे दुःखद निधन
‘दगडूशेठ’ गणपतीला ५० लाख रुपयांचा हिऱ्याचा तिलक सॉलिटेरियो डायमंडस तर्फे अर्पण ; गणेशोत्सवात गणरायाला हिऱ्याच्या तिलकाचा साज
क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने बांधकाम कामगारांना सर्वोत्तम सुविधा देणाऱ्या प्रकल्पांचा सन्मान