मुंबई ४ फेब्रुवारी २०२४: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएलटीए) आणि क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) आयोजित एल अॅण्ड टी मुंबई ओपन डब्लूटीए १लाख २५हजार डॉलर टेनिस स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीत भारताच्या मानांकित खेळाडू अंकिता रैना आणि सहजा यमलापल्ली यांच्यासमोर मानांकित खेळाडूंचे कडवे आव्हान असणार आहे.
जागतिक क्रमवारीत २२८व्या स्थानी असलेल्या अंकिता रैना समोर जांगतिक क्रमवारीत अव्वल १००खेळाडूंच्या यादीत असलेल्या आठव्या मानांकित अमेरिकेच्या कॅटी व्हॉलीनेट्सचे आव्हान असणार आहे. जागतिक क्र. ३३५ असलेल्या भारताच्या सहजा यमलापल्लीचा सामना युनायटेड स्टेटच्या अव्वल मानांकित कायला डे हिच्याशी असणार आहे.
याशिवाय वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश करणाऱ्या अन्य दोन भारतीय खेळाडू ऋतुजा भोसले, वैष्णवी आडकर यांची लढत पात्रता फेरीतील खेळाडूंशी पहिल्या फेरीत होणार आहे. जपानच्या दुसऱ्या मानांकित नाओ हिबिनोचा सामना पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश करणाऱ्या सहा खेळाडूंपैकी एकाशी होणार आहे. डब्लूटीए स्पर्धेत दोन वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या व गतवर्षी कुमार गटात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या अलिना कोर्निव्हाला दुसऱ्या फेरीत आव्हान असणार आहे. १६ वर्षीय अलिना हिने मागील महिन्यात झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत महिला एकेरीत दुसऱ्या फेरीपर्यन्त मजल मारली होती. तिने फ्रांसच्या चालोइ पेक्वेटचा सलामीच्या लढतीत पराभव केला होता.
तिसऱ्या मानांकित फ्रेंच ओपन स्पर्धेत उपांत्य फेरी गाठणारी माजी खेळाडू तमारा झिदानसेकचा सामना एनास्तेसीया तिकोनोव्हाशी होणार आहे. पहिल्या फेरीत ३४ वर्षीय चौथ्या मानांकित अरीना रोडिनोवाची लढत डचच्या सुझान लामेन्सशी होणार आहे. पात्रता फेरीच्या पहिल्या फेरीत झील देसाई, श्रीवल्ली रश्मिका भामिदिप्ती, वैदेही चौधरी यांनी विजयी सलामी दिली असून रविवारी होणाऱ्या अंतिम पात्रता फेरीत त्यांनी प्रवेश केला आहे. स्पर्धेच्या मुख्य ड्रॉ फेरीस सोमवार, ५ फेब्रुवारी २०२४ पासून प्रारंभ होणार आहे.

More Stories
डकारचे आव्हान संजय दुसऱ्यांदा पेलणार, नववर्षातील रॅलीसाठी सज्ज
योनेक्स सनराईज डेक्कन जिमखाना आणि एसबीए कप डिस्ट्रिक्ट सुपर 100 मानांकन बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत जिल्ह्यातून 515 खेळाडू सहभागी
महाराष्ट्र क्रिकेट संघटना पुरुष कॉर्पोरेट चषक स्पर्धा २०२५–२६ ः पुनीत बालन क्रिकेट अकॅडमीचा दणदणीत विजय