पुणे, 25 फेब्रुवारी 2026: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या वतीने व क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र सरकार, पीएमसी, पीसीएमसी आणि पीएमडीटीए यांच्या संलग्नतेने आयोजित पीएमआरडीए पुरस्कृत महा ओपन एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये एकेरीत दुसऱ्या फेरीत महाराष्ट्राचा उभारता टेनिस पटू मानस धामणे याने आपली विजयी मालिका कायम ठेवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत मुख्य ड्रॉ मध्ये दुसऱ्या फेरीत वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या भारताच्या 18वर्षीय मानस धामणे याने जागतिक क्रमवारीत अव्वल मधील माजी खेळाडू इल्या इवाश्काचा 6-3 असा पराभव करून आगेकूच केली. हा सामना 56 मिनिटे चालला. सामन्यात पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी जोरदार खेळ करत सहाव्या गेमपर्यंत आपापल्या सर्व्हिस राखल्या. त्यानंतर मानसने सुरेख रॅली व परतीचे फटके लगावत आठव्या गेममध्ये इल्याची सर्व्हिस भेदली व सामन्यात 5-3 अशी आघाडी घेतली. विशेष म्हणजे या गेममध्ये मानस व इल्या मध्ये तब्बल 22 रॅली झाल्या व मानसने त्याला जोरदार प्रत्युत्तर करत इल्याची सर्व्हिस रोखली व त्यानंतर स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट 6-3 असा जिंकून आघाडी मिळवली. दुसऱ्या सेटमध्ये पहिल्या गेममध्ये मानस 30-00 अशा फरकाने आघाडीवर असताना इल्याने तब्बेत बिघडल्याने माघार घेतली. उपांत्यपूर्व फेरीत मानसचा सामना आता क्रोएशियाच्या दुजे अजदुकोविकशी होणार आहे.
क्रोएशियाच्या बिगर मानांकित दुजे अजदुकोविक याने पोर्तुगलच्या पाचव्या मानांकित फ्रेडेरिको फरेरा सिल्वाचा 6-2, 6-2 असा पराभव करून अनपेक्षित निकालाची नोंद केली. ग्रेट ब्रिटनच्या ॲलिस्टर ग्रे याने तिसऱ्या मानांकित इलिया सिमाकिनचा टायब्रेकमध्ये 4-6, 7-6(7), 7-5 असा कडवा प्रतिकार करत सनसनाटी निकाल नोंदवला. इटलीच्या सहाव्या मानांकित फेडेरिको सिना याने जपानच्या युटा शिमिझूचे आव्हान 6-1, 6-4 असे मोडीत काढले.
दुहेरीत पहिल्या फेरीत अव्वल मानांकित भारताच्या सिद्धांत बांठिया याने बल्गेरियाच्या अलेक्झांडर डोन्स्कीच्या साथीत स्वित्झर्लंडच्या लुका कॅस्टेलनुओवो व कोरियाच्या उईसुंग पार्कचा 7-6(5), 6-2 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. भारताच्या साकेत मायनेनी व दिग्विजयप्रताप सिंग या जोडीने जपानच्या मासामिची इमामुरा व कोकोरो इसोमुरा यांचा 6-3, 6-3 असा पराभव करून आगेकूच केली. जपानच्या रियुकी मात्सुदा व इलिया सिमकिन या जोडीने भारताच्या आर्यन लक्ष्मणन व मलेशियाच्या मित्सुकी वेई कांग लिओंगचा 7-6(5), 7-5 असा पराभव केला.
निकाल: मुख्य ड्रॉ: दुसरी फेरी: एकेरी:
दुजे अजदुकोविक(क्रोएशिया)वि.वि.फ्रेडेरिको फरेरा सिल्वा[5](पोर्तुगल) 6-2, 6-2;
ॲलिस्टर ग्रे(ग्रेट ब्रिटन)वि.वि. इलिया सिमाकिन[3] 4-6, 7-6(7), 7-5;
फेडेरिको सिना[6](इटली)वि.वि.युटा शिमिझू (जपान)6-1, 6-4;
मानस धामणे (भारत)वि.वि. इल्या इवाश्का 6-3 सामना सोडून दिला;
दुहेरी: पहिली फेरी:
सिद्धांत बांठिया(भारत)/अलेक्झांडर डोन्स्की(बल्गेरिया)[1]वि.वि.लुका कॅस्टेलनुओवो(स्वित्झर्लंड)/ उईसुंग पार्क(कोरिया)7-6(5), 6-2;
साकेत मायनेनी(भारत)/ दिग्विजयप्रताप सिंग(भारत)वि.वि.मासामिची इमामुरा(जपान)/कोकोरो इसोमुरा(जपान) 6-3, 6-3;
जे क्लार्क(ग्रेट ब्रिटन)/मायकेल गीर्ट्स(बेलारूस)वि.वि.ताकुया कुमासाका(जपान)/ रिओ नोगुची(जपान) 6-3, 6-4;
रियुकी मात्सुदा(जपान)/ इलिया सिमकिन वि.वि.आर्यन लक्ष्मणन/मित्सुकी वेई कांग लिओंग(मलेशिया) 7-6(5), 7-5;
जिसुंग नाम(कोरिया)/ पॅट्रिक निकलस-साल्मिनेन [4](फिनलँड)वि.वि.मानस धामणे(भारत)/आदित्य बलसेकर(भारत)6-2, 6-1.

More Stories
पहिल्या पीवायसी- पुसाळकर फाउंडेशन पिकलबॉल साखळी स्पर्धेत गरगंटू डिस्ट्रॉयर्स, के-प्रा पिकलर्स संघांची विजयी सलामी
पुणे जिल्हा फुटबॉल संघटना सुपर डिव्हीजन श्रेणी फुटबॉल 2026स्पर्धेत सीएमएस फाल्कन्स, परशुरामियन्स एफसी, स्निग्मय पुणे एफसी, जीओजी एफसी संघांची विजयी सलामी
रुग्ण हक्क परिषदेच्या अध्यक्षपदी उमेश चव्हाण यांची फेरनिवड