March 3, 2026

पीएमआरडीए पुरस्कृत महा ओपन एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत भारताच्या सुमित नागलचे आव्हान संपुष्टात

पुणे, 26 फेब्रुवारी 2026: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या वतीने व क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र सरकार, पीएमसी, पीसीएमसी आणि पीएमडीटीए यांच्या संलग्नतेने आयोजित पीएमआरडीए पुरस्कृत महा ओपन एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये एकेरीत दुसऱ्या फेरीत भारताच्या सुमित नागल याला पराभवाचा सामना करावा लागल्याने त्याचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत मुख्य ड्रॉ मध्ये दुसऱ्या फेरीत ग्रेट ब्रिटनच्या फेलिक्स गिल याने भारताच्या वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या सुमित नागलचा 7-6(4), 0-6, 6-3 असा संघर्षपूर्ण पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. फेलिक्सने सुमितचे कडवे आव्हान 2 तास 37 मिनिटात मोडीत काढले. सामन्यात पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी आपापल्या सर्व्हिस राखत जिगरबाज खेळाचे प्रदर्शन केले. 12व्या गेमपर्यंत बरोबरी कायम राहिले हा सेट टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्ये फेलिक्सने जोरदार खेळ करत हा सेट 7-6(4) असा जिंकून आघाडी घेतली. पिछाडीवर असलेल्या सुमितने आक्रमक खेळ करत पहिल्याच गेममध्ये फेलिक्सची सर्व्हिस रोखली. या सेटमध्ये सुमितने निर्वीवाद वर्चस्व राखत तिसऱ्या, पाचव्या गेममध्ये फेलिक्सची पुन्हा सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 6-0 असा सहज जिंकून सामन्यातील आपले आव्हान कायम राखले. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये फेलिक्सने दुसऱ्या गेममध्ये सुमितची सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 6-3 असा जिंकून विजय मिळवला.

दुसऱ्या सामन्यात पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या जपानच्या मासामिची इमामुरा याने ग्रेट ब्रिटनच्या दुसऱ्या मानंकित जे क्लार्कचा 6-2, 6-4 असा पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली. हा सामना 1 तास 19मिनिटे चालला. लिथुनियाच्या आठव्या मानांकित एडास बुटविलास याने क्वालिफायर तैपेईच्या तुंग-लिन वूचा 6-3, 6-0 असा सहज पराभव करून आगेकूच केली.

दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या तिसऱ्या मानांकित युता शिमिझू व सीता वातनाबे या जोडीने भारताच्या वाईल्ड कार्ड द्वारे केलेल्या साकेत मायनेनी व दिग्विजयप्रताप सिंग यांचा 6-4, 6-4 असा पराभव करून त्यांचे आव्हान संपुष्ठात आणले.

निकाल: मुख्य ड्रॉ: दुसरी फेरी: एकेरी:
एडास बुटविलास [8](लिथुनिया)वि.वि.तुंग-लिन वू (तैपेई) 6-3, 6-0;
फेलिक्स गिल(ग्रेट ब्रिटन)वि.वि.सुमित नागल(भारत) 7-6(4), 0-6, 6-3;
मासामिची इमामुरा(जपान)वि.वि.जे क्लार्क[2](ग्रेट ब्रिटन)6-2, 6-4;

दुहेरी: उपांत्यपूर्व फेरी:
जिसुंग नाम(कोरिया)/ पॅट्रिक निकलस-साल्मिनेन (फिनलँड)[4] वि.वि.रियुकी मात्सुदा(जपान) /इलिया सिमाकिन 6-3, 6-3;
युता शिमिझू(जपान)/ सीता वातनाबे [3](जपान)वि.वि.साकेत मायनेनी(भारत)/दिग्विजयप्रताप सिंग(भारत)6-4, 6-4;
प्रुच्या इसारो(थायलंड)/निकी कालियांदा पूनाचा(भारत)[2] वि.वि. जे क्लार्क(ग्रेट ब्रिटन)/ मायकेल गीर्ट्स(बेलारूस) 1-0 सामना सोडून दिला.