पिंपरी, १३ जून २०२५ ः पिंपरी-चिंचवड शहरात येणाऱ्या संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने तयारीला अंतिम रूप दिले आहे. पालखी मार्ग, मुक्काम स्थळे आणि वारकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या विविध सुविधा यांचा आढावा घेत अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी गुरुवारी पाहणी केली.
या वर्षी संत तुकाराम महाराजांची पालखी १९ जून रोजी, तर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी २० जून रोजी शहरात दाखल होणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून स्वागतासाठी विविध सेवा-सुविधांची तयारी करण्यात आली असून, त्या वेळेत पूर्ण करण्याचे आदेश खोराटे यांनी दिले.
पालखी मार्ग आणि मुक्काम स्थळाची पाहणी करताना खोराटे यांच्या समवेत सहशहर अभियंते बापू गायकवाड, देवन्ना गट्टूवार, उपायुक्त सचिन पवार, सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे, सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख ओमप्रकाश बहिवाल, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे आणि अन्य संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना खोराटे म्हणाले, “वारी दरम्यान कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये, यासाठी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विशेष तयारी केली पाहिजे. पिण्याचे पाणी, फिरती शौचालये, आरोग्य सुविधा, तातडीचे वैद्यकीय उपचार, वारकऱ्यांसाठी निवास आदी गोष्टींचे नियोजन चोख असावे. विभागांनी आपसात समन्वय ठेवून काम करावे.”
निगडीतील भक्ती शक्ती परिसरात पालखीचे स्वागत केंद्र उभारले जात असून, याठिकाणी करण्यात येणाऱ्या व्यवस्थांची माहितीही पाहणी दरम्यान त्यांनी घेतली. पावसाचे पाणी साचू नये यासाठी निचऱ्याच्या व्यवस्थेचा पुनर्विचार करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महापालिकेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही, याची हमी प्रशासनाने दिली असून, वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे देखील प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
More Stories
Pune: चाकण भागातील सव्वादोनशे अतिक्रमणावर हातोडा
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या १४१ शाळांमध्ये आफ्टर-स्कूल मॉडेलची सुरुवात
PCMC: ३० सप्टेंबरपूर्वी ऑनलाइन मालमत्ता कर भरा आणि मिळवा ४ टक्के सवलत!