December 14, 2024

‘लक्ष्य’ स्पोर्ट्सचा 12नव्या खेळाडूंसह एकुण 40खेळाडूंना पाठिंबा

पुणे, 11 मार्च 2023: क्रिडा क्षेत्राला सर्व बाबतीत पाठिंबा देण्याबद्दल राष्ट्रीय पुरस्कार मिळविणाऱ्या ‘लक्ष्य’ या संस्थेने 12 नव्या खेळाडूंसह एकुण 40 खेळाडूंना करारबद्ध करताना आपल्या उपक्रमाची व्याप्ती वाढवली. याचवेळी गोल्ड या नावाने नव्या मॉनिटरिंग ऍपचे अनावरण करण्यात आले.

लक्ष्यच्या 13व्या वर्धापन दिनानिमित्त पत्रकारांशी बोलताना लक्ष्यचे अध्यक्ष सत्येन पटेल म्हणाले की, देशभरातील विविध खेळाडूंना पाठिंबा देण्याच्या आमच्या मोहिमेत टप्प्याटप्प्याने परंतु निश्चित आगेकूच होत आहे. केवळ एक करमणूक किंवा उपक्रम या टप्प्यापासुन क्रिडा क्षेत्राची आता आपल्या देशात वैयक्तिक आणि व्यावसायिक स्तरावर एक गांभीर्यपूर्वक स्वीकारण्याची व निष्ठेने दीर्घकाळ करण्याची मोहीम बनली आहे, हे सांगण्यास मला आनंद होत आहे.

क्रीडा क्षेत्र ही केवल खेळाडू किंवा संघटनांसाठी गांभीर्याने करण्याची गोष्ट राहिली नसून भारतीय खेळाडूंना नव्या उंचीवर नेण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या अनेक संघटना आणि शासन यांची ही त्यात भर पडली आहे. या संपुर्ण यंत्रणेचा गेल्या दशकापासून लक्ष्य हा एक महत्वाचा घटक बनला आहे. लक्ष्य कुटुंबाचा एक भाग आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करणाऱ्या आणि देशाचा राष्ट्रध्वज उंचावणाऱ्या खेळाडूंचा अभिमान वाटतो.

लक्ष्यने नव्याने करारबद्ध केलेल्या 12 खेळाडूंमध्ये आलिफिया पठाण(आशियाई मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धा 2022 स्पर्धेत सुवर्णपदक विजेती)(मोर्डे फुड्स), देविका घोरपडे (युथ जागतिक मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक विजेती)(एडलगीव), आशिष कुमार (टोकियो ऑलिम्पिक व कॉमन वेल्थ गेम्स स्पर्धेतील सदस्य)(सह्याद्री इंडस्ट्रीज), दिव्या काकरण (कॉमन वेल्थ गेम्स 2022 स्पर्धेतील कांस्य पदक विजेती)(भारत फोर्ज), सुनिल कुमार (23 वर्षाखालील आशियाई मुष्टियुद्ध अजिंक्यपद 2023 स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता)(एडलगीव), कॉमन वेल्थ गेम्स स्पर्धेतील टेबल टेनिस संघातील सदस्य रीत रिश्या (मोर्डे फुड्स), फेनेस्टा ओपन राष्ट्रीय टेनिस स्पर्धेतील दुहेरीतील उपविजेती आकांक्षा नित्तुरे (भारत फोर्ज), 15 वर्षाखालील राष्ट्रीय विजेती जेनिफर वर्घसे (चेवियट), 19 वर्षाखालील राष्ट्रीय अजिंक्यपद 2022स्पर्धेतील रजत पदक विजेती तनिशा कोटेचा (चेवियट), स्नेहा शेरॉन (सह्याद्री), आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद 2022स्पर्धेतील रजत पदक विजेता अनिश डेनिइ(सह्याद्री), प्रतिक देशमुख(सह्याद्री) यांचा समावेश आहे.

लक्ष्यचे सचिव सुंदर अय्यर म्हणाले की, ऑलिम्पिक पदक तक्त्यात भारत अव्वल स्थानी असावा हे आमचे ध्येय असून हे स्वप्न करणे शक्य आहे. त्यासाठीच आम्ही 40खेळाडूंना पाठिंबा देत असून त्यामध्ये 32टक्के पुरूष खेळाडू तर, 38टक्के महिला खेळाडू आहेत. लक्ष्यने पाठिंबा दिलेल्या खेळाडूंचे सरासरी वय 21 असून आम्ही पाठिंबा दिलेल्या खेळाडूंमध्ये 24 कुमार व 16 वरिष्ठ खेळाडूंनी एकुण 102पदके पटकावली असून त्यात 13 प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धा, 23 आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि 68 राष्ट्रीय स्पर्धांचा समावेश आहे. यातही 83पदके महिला खेळाडूंनी, तर 19पुरुष खेळाडूंनी पटकावली आहेत.

अय्यर पुढे म्हणाले की, आमच्या खेळाडुंबरोबरच लक्ष्यची ही प्रगती होत आहे. आम्ही त्यांना केवळ आर्थिक साहाय्य करीत नसून त्यांना शारीरिक व मानसिकदृष्ट्या कणखर बनवत आहोत. आम्ही आमच्या खेळाडूंसाठी फिटनेस टेस्ट, मेंटल कंडिशनिंग, आहार तज्ञ, मानसोपचार तज्ञ, दुखापत व्यवस्थापन तसेच शस्त्रक्रियांची गरज असलेल्या खेळाडूंना साहाय्य असे उपक्रम वर्षभर राबवत असतो.

ते पुढे म्हणाले की, आमच्या प्रयत्नांना भरीव यश मिळाले असून  देविका घोरपडेने जागतिक युवा मुष्टियुद्ध विजेतेपद, आलिफिया पठाणने आशियाई मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धा 2022 स्पर्धेत सुवर्णपदक विजेतेपद,  शरथ कमलने राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेतेपद, दिव्या काकरणने राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक, सुहाना सैनीने जागतिक युवा स्पर्धेत कांस्यपदक, साजन भानवालने 23 वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक, श्रावणी लवाटेने ज्युनियर आशियाई स्पर्धेत रौप्य पदक, सुनिल कुमारने आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक असे यश मिळवले असून आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो.

लक्ष्यचे खजिनदार भरत शहा म्हणाले की, ऑलिम्पिक पदकाच्या ध्येयाकडे आगेकूच करणाऱ्या खेळाडूंच्या प्रगतीची नोंद ठेवण्यासाठी गोल्ड या प्रोप्रायटरी ऍपचे आम्ही अनावरण करत आहोत. या ऍपमुळे खेळाडूंचे मानांकन फिटनेस आणि कामगिरी यावर लक्ष ठेवता येणार आहे. तसेच, मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करून भविष्य काळातील लक्ष निश्चित करता येईल. विविध प्रायोजकांकडून मिळणाऱ्या निधी साठी आम्ही जबाबदार असून खेळाडूंच्या सर्वांगीण प्रगतीची आणि आवश्यकतांची माहिती या ऍप द्वारे संकलित होणार असल्याने ही यंत्रणा पारदर्शक होणार असून त्यामूळे आमच्या गुंतवणूक दारांचे ही समाधान होईल

याप्रसंगी खेळाडूंचा सत्काराबरोबरच कॉफी टेबल बुकचे देखील अनावरण करण्यात आले.या कॉफी टेबल बुकमध्ये गेल्या 13वर्षातील लक्ष्यने पाठिंबा दिलेल्या 100 खेळाडूंची माहिती देण्यात आली आहे.

यावेळी लक्ष्यचे माजी अध्यक्ष विशाल चोरडिया, उपाध्यक्ष स्वस्तिक सिरसीकर, आशिष देसाई, प्लेअर मेंटोर ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे, लक्ष्यचे कार्यकारी सदस्य संदीप नुलकर, अनिल छाजेड, गिरीश चितळे, हर्षल मोर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.