पुणे, 22/02/2023 : यजमान महाराष्ट्राचे ८४ व्या योनेक्स सनराईज वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. कर्नाटकडून महाराष्ट्राला ३-२ असा पराभव पत्करावा लागला. महाराष्ट्राकडून केवळ शुभंकर डे, मालविका बनसोड यांनी विजय मिळविले.
पुणे जिल्हा आणि महानगर बॅडमिंटन संघटना (पीडीएमबीए) यांच्या वतीने आयोजित डॉ. सायरस पूनावला आणि वेंकीज यांच्या सहकार्याने व बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन यांच्या मान्यतेने ८४ वी योनेक्स सनराईज वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरु आहे. स्पर्धेत महिला फेरीच्या लढतीत कर्नाटकने दुहेरीतील यशाच्या जोरावर महाराष्ट्रावर बाजी मारली. कर्नाटकने दुहेरीतील तीनही लढती जिंकल्या. एकेरीत महाराष्ट्राच्या शुभंकर डे आणि मालविका बनसोड यांनी विजय मिळविले.
साई प्रतिक के-अश्विनी भट के. या कर्नाटकच्या जोडीने महाराष्ट्राच्या दीप रांभिया-रितीका ठाकर जोडीवर २१-१४,२१-१६ असा विजय मिळविला. मिश्र दुहेरीतील या विजयाने कर्नाटकाने अपेक्षित सुरुवात केली. मात्र, नंतर पुरुष एकेरीत शुभंकर डे ने कर्नाटकच्या सनिथ डी. एस.चा २१-१६, २१-१८ असा पराभव करून महाराष्ट्राला बरोबरी साधून दिली. ही लढत ४९ मिनिटे चालली. त्यानंतर महिला एकेरीत मालविका बनसोड ला तान्या हेमंथ कडून अनपेक्षित झुंज मिळाली. मालविकाने १ तास ५ मिनिटांच्या मॅरेथॉन लढतीनंतर तान्याचे आव्हान २१-१७, १९-२१, २१-१५ असे संपुष्टात आणले. एकेरीतील दोन्ही विजय मिळवून महाराष्ट्राने २-१ अशी आघाडी घेतली.
मात्र, पुरुष दुहेरीत दीप रांभिया-अक्षण शेट्टी आणि महिला दुहेरीत पूर्वा बर्वे-रितिका ठाकर यांना विजय मिळविता आले नाहीत. त्यांना कर्नाटकच्या जोड्यांकडून एकतर्फी लढतीत पराभव पत्करावा लागला. कर्नाटकच्या नितीन एच.व्ही.- साई प्रतिकर के. जोडीने महाराष्ट्राच्या दीप-अक्षण चा २१-१७, २१-१४ असा पराभव केला. महिला दुहेरीत शिखा गौतम-अश्विनी भट जोडीने महाराष्ट्राच्या पूर्वा-रितीकाला २१-११, २१-११ असे सहज हरवले.
अन्य लढतीत मणिपूरने हरयानाचा ३-२, पेट्रोलियम क्रीडा मंडलाने उत्तराखंडचा ३-० असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
More Stories
..तर देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध खटला भरला पाहीजे – सुप्रिया सुळे
शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील ७ मतदान केंद्र स्थलांतरीत
बटेंगे तो कटेंगे घोषणेवरून भाजप आणि राष्ट्रवादीत मतभेद