January 8, 2026

पुण्यात महाविकास आघाडीचा फॉर्म्युला निश्चित; तिन्ही प्रमुख पक्षांना समान जागा

पुणे, २७ डिसेंबर २०२५: पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, अखेर महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले होते; मात्र ही चर्चा फिस्कटल्याने महाविकास आघाडीच्या पर्यायावर पुन्हा भर देण्यात आला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षांना प्रत्येकी समान जागा देण्याचा निर्णय झाल्याचे सांगितले जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांना प्रत्येकी ५०-५० जागा देण्यात येणार असून, उर्वरित जागा समविचारी पक्षांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. या संदर्भात काल झालेल्या बैठकीनंतर आघाडीतील नेत्यांनी अंतर्गत पातळीवर तयारीला सुरुवात केली आहे.

या बैठकीबाबत काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी माहिती देताना सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी म्हणून सातत्याने चर्चा सुरू होती. या चर्चेदरम्यान अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोबत घ्यायचे की नाही, यावरही विचारविनिमय करण्यात आला. मात्र, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी भाजपसोबत सत्तेत सहभागी असलेल्या पक्षांशी आघाडी करू नये, अशी स्पष्ट भूमिका मांडली. ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्यांपर्यंत पोहोचविण्यात आली, असे शिंदे यांनी सांगितले.

शिंदे म्हणाले, “यानंतर पुन्हा महाविकास आघाडी म्हणून चर्चा करण्यात आली असून, प्रत्येक प्रभागानुसार सविस्तर विचारविनिमय झाला आहे. ही निवडणूक समविचारी पक्षांना एकत्र घेऊन लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, मनसेला सोबत घेण्यात येणार नसून महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्ष एकत्रितपणे ही निवडणूक लढविणार आहेत.”

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष समान जागांवर निवडणूक लढवतील, अशी स्पष्ट भूमिका यावेळी मांडण्यात आल्याने पुणे महापालिका निवडणुकीतील राजकीय समीकरणे अधिक स्पष्ट होत असल्याचे चित्र आहे.