पुणे, 09 जानेवारी 2026: “महापालिका निवडणुकीत भाजप पराभूत झाला, तर त्याचे खापर आपल्यावर फुटेल या भीतीने मुरलीधर मोहोळ घाबरले आहेत,” असा थेट हल्ला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे निवडणूक प्रभारी व आमदार रोहित पवार यांनी केला. मोहोळ यांनी ‘गुंड निलेश घायवळ याला पासपोर्ट देण्याच्या मुद्द्यावर’ उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलेल्या आव्हानावर पवार यांनी प्रतिआव्हान दिले. “दादांना कशाला चॅलेंज करता? गुंडाच्या पासपोर्टच्या विषयावर मीच तुमच्याशी बोलायला तयार आहे,” असे पवार म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी वारजे परिसरात झालेल्या सभेत पवार बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपकडून अजित पवार यांच्यावर होत असलेल्या टीकेचा जोरदार समाचार घेतला.
“शहरात कोणताही प्रकल्प सुरू करण्यापूर्वी संबंधित परवानग्या घ्याव्याच लागतात. याबाबत अजित पवार आपली भूमिका मांडत होते. मात्र भाजपकडून पुण्यात सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पांना आणि विविध व्यवसायांना जाणीवपूर्वक अडथळे आणले जात आहेत. फोन करून ‘अडचण करू’ अशा धमक्या दिल्या जात आहेत,” असा आरोप पवार यांनी केला.
पवार म्हणाले, “भाजपने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांची अक्षरशः वाताहत केली आहे. सत्ताधाऱ्यांनी ज्या पद्धतीने विकास करायला हवा होता, तसा विकास झालेला नाही. महेश लांडगे यांनी ‘आपण बांगड्या भरल्या नाहीत’ असे वक्तव्य करून महिलांचा उघडपणे अपमान केला आहे. यातूनच त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर येत असून, त्यामुळेच लांडगे आता घाबरले आहेत.”
मोहोळ यांचा ‘गेम’ कोणी केला तेही सांगू – पवार
जैन बोर्डिंग प्रकरणावरून पवार यांनी मोहोळ यांना धारेवर धरले. “मोहोळ यांचे दिल्लीतील संपर्क वाढले आहेत. या संपर्कांमधूनच त्यांचा नेमका ‘गेम’ कोणी केला, हेही आम्ही सांगू शकतो,” असा सूचक इशाराही पवार यांनी दिला.

More Stories
Pune: अखेर मतमोजणी केंद्र ठरली, महापालिकेकडून केंद्राची माहिती जाहीर
अभिनेत्री गिरीजा ओक फडणवीसांना करणार बोलते: पुण्याचे विकास व्हिजन मांडणार
Pune: पुणे फस्ट चा काँग्रेसचा नारा – जाहीरनाम्यात केल्या तरतुदी