पुणे, ४ मार्च २०२६ : शहरातील गजबजलेल्या विमाननगर भागातील सुप्रसिद्ध रामेश्वरम हॉटेलवर आज महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने थेट हातोडा चालवला. फ्रंट मार्जिनमध्ये करण्यात आलेले बेकायदा वाढीव बांधकाम पाडत प्रशासनाने सुमारे ६,५०० चौ. फूट क्षेत्र मोकळे केले. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
सकाळी पोलीस बंदोबस्तात महापालिकेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. हॉटेलसमोरील वाढीव शेड, लोखंडी स्ट्रक्चर, प्लॅटफॉर्म तसेच ग्राहकांसाठी उभारलेली अतिरिक्त जागा अधिकृत नकाशात नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. नोटिसा देऊनही संबंधितांकडून प्रतिसाद न मिळाल्याने अखेर प्रत्यक्ष कारवाई करण्यात आली.
रामेश्वरम हॉटेल हे परिसरातील लोकप्रिय खाद्यपदार्थांसाठी ओळखले जाते. येथे सकाळपासून मोठी गर्दी होत असते. मात्र, हॉटेलसमोरील वाढीव बांधकामामुळे रस्ता अरुंद झाला होता आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत होता. तसेच पादचाऱ्यांना चालण्यासाठी पुरेशी जागा उरत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून वारंवार करण्यात येत होत्या.
आजच्या मोहिमेत नेको गार्डन परिसर, सम्राट हॉटेल लेन, कृष्णा हॉटेल चौक आणि गणपती मंदिर चौक येथेही फ्रंट मार्जिनवरील अतिक्रमणे हटवण्यात आली. मात्र, रामेश्वरम हॉटेलवरील कारवाईमुळेच सर्वाधिक चर्चा रंगली.
कारवाईदरम्यान काही व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली; परंतु प्रशासनाने ‘नियमांपुढे कोणीही मोठे नाही’ असा स्पष्ट संदेश दिला. “शहरातील रस्ते मोकळे ठेवणे आणि नागरिकांची सुरक्षितता ही आमची प्राथमिकता आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पुढेही कठोर कारवाई करण्यात येईल,” असे अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
महापालिकेच्या या धडाकेबाज मोहिमेमुळे शहरातील इतर व्यावसायिक आस्थापनांमध्येही धास्तीचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील काही दिवसांत आणखी कारवाया होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

More Stories
पुणे : रसिकलाल धारीवाल यांच्या स्मृतिदिनानिमित्त ३५० जणांचे रक्तदान; नववे वार्षिक शिबिर उत्साहात संपन्न
Pune: विमानतळापर्यंत थेट मेट्रोची कनेक्टिव्हिटी – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Pune: मेट्रो सफर, रेल्वे म्युझियम पाहून बालगोपाल हरखले