पुणे, ०६/०४/२०२३: सर्व सार्वजनिक विद्यापीठे, त्यांच्याशी संलग्न महाविद्यालये, सर्व अभिमत महाविद्यालये यांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून (२०२३-२४) पासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला सुरुवात केली जाणार आहे अशी माहिती राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या राज्य सुकाणू समितीचे अध्यक्ष व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.नितीन करमळकर यांनी पालक विद्यार्थी सवांदादरम्यान दिली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या धोरणाच्या अनुषंगाने शिक्षणात होणाऱ्या बदलांची माहिती देण्यासाठी जनजागृतीपर व्याख्यानाचे आयोजन केले होते. त्यावेळी डॉ. करमळकर बोलत होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे, प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, सुकाणू समिती सदस्य व तज्ज्ञ मार्गदर्शक प्राचार्य अनिल राव, समिती सदस्य व मुंबई विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ.आर.डी.कुलकर्णी, व्यवस्थापन परिषद सदस्य व कार्यक्रमाचे संयोजक डॉ.रविंद्र शिंगणापूरकर, बागेश्री मंठाळकर, अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षाचे संचालक डॉ.संजय ढोले आदी मान्यवर व्यापीठावर उपस्थित होते.
डॉ. करमळकर यांनी विस्ताराने धोरणाविषयी माहिती दिली. सरसकट चार वर्षाची पदवी न होता विद्यार्थ्याला प्रत्येक टप्प्यावर अभ्यासक्रम पूर्ण करत बाहेर पडण्याची संधी आहे असे सांगत असताना ते म्हणाले, पालकांनी विद्यार्थ्यांनी धोरणानुसार होणाऱ्या बदलांनी गोंधळून, घाबरून न जाता याकडे संधी म्हणून पाहावे.
यावेळी डॉ.कारभारी काळे यांनी या शैक्षणिक धोरणाची संकल्पना समजून घ्यावी असे आवाहन विद्यार्थी व पालकांना केले. तसेच राज्य सरकार, उच्च शिक्षण विभागाचेही आभार मानले.
यावेळी डॉ. राव यांनी सध्याची शिक्षण पद्धती कशी सुरू आहे, त्यात का बदल करणे आवश्यक आहेत, नवीन शैक्षणिक धोरण कशासाठी आणले आहे, त्याची अंमबजावणी कशी होणार आहे आदी बाबी सोप्या भाषेत समजावून सांगितल्या.
तर डॉ.आर.डी.कुलकर्णी पदवी अभ्यासक्रम कसा बदलणार आहे, क्रेडिट सिस्टीम कशी लागू होणार, बहुविद्याशाखीय, आंतरविद्याशाखीय म्हणजे काय, क्रेडिट बँक, मल्टिपल एन्ट्री, मल्टिपल एक्झिट, तसेच विद्यार्थी त्यांचे विषय कसे निवडतील, भाषा, कौशल्य आदींचा समावेश याबाबत सविस्तर सांगितले.
तर रविंद्र शिंगणापूरला म्हणाले, पालक विद्यार्थी आणि समिती सदस्य यांचा संवाद घडवून आणण्याचा हा पहिला अभिनव उपक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केला आहे. यातून अनेक पालकांच्या मनातील अनेक शंका दूर झाल्या असतील अशी आशा आहे.
हा कार्यक्रमाचा आस्वाद ऑनलाइनच्या माध्यमातून तीन हजारांहून अधिक जणांनी घेतला. हा संपूर्ण कार्यक्रम विद्यापीठाच्या ‘ सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी (ecdlic)’ या यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध आहे. या कार्यक्रमात अनेक विद्यार्थी व पालकांनी आपल्या शंकांचे निरसन केले. डॉ.वैभव जाधव यांनी मानले.
लिंक – https://www.youtube.com/live/0F3_sKOfTcM?feature=share
More Stories
पुणे: शहराच्या प्रवेशद्वारावर व्हीआयपी स्वच्छतागृह
.. तर पुण्याचे महापौरपद आऱपीआयला मिळावे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मागणी
एम्प्रेस गार्डन मध्ये पुष्प प्रदर्शन आजपासून नागरिकांसाठी खुले