October 14, 2025

एनइसीसी डेक्कन आयटीएफ 75,000डॉलर महिला टेनिस स्पर्धेस 26 जानेवारीपासून प्रारंभ

पुणे, 24 जानेवारी 2025: एनईसीसी डेक्कन आयटीएफ महिला टेनिस स्पर्धा ही भारतातील दीर्घकाळ चालत असलेली प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय स्पर्धा असून यंदाच्या वर्षीच्या मालिकेत स्पर्धेच्या रकमेत वाढ झाली असून ती आता आयटीएफ 75,000डॉलर करण्यात आली आहे.

डेक्कन जिमखाना यांच्या वतीने आयोजित नॅशनल एग कॉर्डीनेशन कमिटी(एनइसीसी) यांनी प्रायोजित केलेल्या व आयटीएफ, एआयटीए आणि एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली 24व्या एनइसीसी डेक्कन आयटीएफ 75,000डॉलर महिला टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे .हि स्पर्धा डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट या ठिकाणी 26 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2025 या कालावधीत रंगणार आहे.

आंतरराष्ट्रीय टेनिस संघटना(आयटीएफ), एआयटीए यांच्या पुढाकाराने यावर्षी या स्पर्धेचा दर्जा आणखी उंचावण्यात आला असून गतवर्षीच्या 50,000डॉलर रकमेची स्पर्धा आता यावर्षी 75, 000डॉलर आयोजित करण्यात आली आहे. पुढील वर्षी हि स्पर्धा आपले रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करणार असून यावर्षी हि स्पर्धा 1,00,000डॉलर करण्याचा आमचा मानस असल्याचे एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर यांनी सांगितले.

24 वर्षांपुर्वी नॅशनल एग कॉर्डीनेशन कमिटीच्या(एनइसीसी) च्या अनुराधा देसाई यांनी घेतलेल्या पुढाकाराने एकाच प्रयोजकाचा पाठिंबा लाभलेली आणि सर्वाधिक कालावधीसाठी सुरु असलेली आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांपैकी ही एक स्पर्धा असल्याचे डेक्कन जिमखानाचे टेनिस विभागाचे सचिव व स्पर्धा संचालक डॉ. विक्रांत साने यांनी सांगितले.

यावर्षी स्पर्धेत जगभरातील 21 देशांहून अधिक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला असून स्पर्धेची एकूण रक्कम 75,000डॉलर( 65लाख) याव्यतिरिक्त एकेरी व दुहेरीतील विजेत्यांना 75डब्लूटीए गुण देखील मिळणार आहे. या स्पर्धेमुळे भारतीय खेळाडूंना महत्वपूर्ण डब्लूटीए गुण मिळवण्याची संधी मिळणार असून या स्पर्धेचा दर्जा आणखी उंचावत जाईल अशी आशा असल्याचे त्यांनी सांगितले.

स्पर्धेत जागतिक क्रमवारीत 120व्या स्थानी असलेली व गतवर्षी एल अँड टी मुंबई ओपन स्पर्धेत विजेतेपद पटकावणाऱ्या लात्वियाच्या दारजा सेमेनिस्तजा हिला अग्रमानकंन देण्यात आले आहे. तर, जागतिक क्र. 149 असलेली फ्रांसची लिओलिया जीनजीनला दुसरे, चेक प्रजासत्ताकच्या सारा बिजलेकला तिसरे, हंगेरीच्या पन्ना उदावर्दी हिला चौथे मानांकन देण्यात आले आहे. लिकटेंस्टाईनच्या कॅथीन्का वॉन डीचमनला पाचवे, डचच्या एरियन हार्टोनोला सहावे, ब्राझीलच्या लॉरा पिगोस्सीला सातवे व थायलंडच्या लानलाना तारारुडीला आठवे मानांकन देण्यात आले आहे.

तसेच, या स्पर्धेत याआधी विजेतेपद पटकावलेल्या इमा राडूकानू, आर्यना सबलेंका, बोजना जोवानोवस्की, मागदा लीनेटी, कॅटेरीना बोंडारेन्को, मोयुका उचीजिमा या खेळाडूंनी डब्लूटीए टूरमध्ये अव्वल 50 खेळाडूंमध्ये देखील स्थान प्राप्त केले आहे. आयटीएफ गोल्ड बॅच रेफ्री शितल अय्यर यांची या स्पर्धेसाठी आयटीएफ सुपरवायझर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

2001पासून हि स्पर्धा सुरु असून त्यावेळी या स्पर्धेची पारितोषिकाची रक्कम 5,000डॉलर होती. परंतु 2006-2008मध्ये या स्पर्धेच्या पारितोषिकाची रक्कम वाढविण्यात आली व ती 25,000डॉलर करण्यात आली. 2009मध्ये या स्पर्धेला 10वर्षे पूर्ण झाल्याबद्दल 50,000डॉलर करण्यात आली आणि 2010 ते 2020 पर्यंत या स्पर्धेची रक्कम 25,000डॉलर करण्यात आली. 2022-24 या कालावधीत हि स्पर्धा 35,000डॉलर व 50,000डॉलर होती.

स्पर्धेतील एकेरी गटातील विजेत्या खेळाडूला 75डब्लूटीए गुण, तर उपविजेत्या खेळाडूला 49डब्लूटीए गुण देण्यात येणार आहे. याशिवाय उपांत्य फेरीतील खेळाडूला 29डब्लूटीए गुण, उपांत्यपूर्व फेरीतील खेळाडूला 16डब्लूटीए गुण, पहिल्या फेरीतील खेळाडूला 9डब्लूटीए गुण, आणि या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूला 1डब्लूटीए गुण देण्यात येणार आहे. स्पर्धेतील दुहेरी गटातील विजेत्या जोडीला 75डब्लूटीए गुण, उपविजेत्या जोडीला 49 डब्लूटीए गुण, उपांत्य फेरीतील जोडीला 29डब्लूटीए गुण, उपांत्यपूर्व फेरीतील जोडीला 16डब्लूटीए गुण आणि पहिल्या फेरीतील जोडीला 1डब्लूटीए गुण देण्यात येणार असल्याचे साने यांनी सांगितले.

स्पर्धेचे उदघाटन केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार व भारती विद्यापीठचे सचिव डॉ. विश्वजित कदम आणि एनइसीसीचे बीएसआर शास्त्री यांच्या हस्ते होणार आहे.

खेळाडूंची मानांकन यादी खालीलप्रमाणे:

1. दारजा सेमेनिस्तजा (लात्विया, 120), 2. लिओलिया जीनजीन (फ्रांस, 149), 3. सारा बिजलेक (चेक प्रजासत्ताक, 156), 4. पन्ना उदावर्दी (हंगेरी, 157), 5.कॅथीन्का वॉन डीचमन(लिकटेंस्टाईन, 162) , 6. एरियन हार्टोनो (नेदरलँड, 164), 7.लॉरा पिगोस्सी (ब्राझील, 165), 8.लानलाना तारारुडी(थायलंड, 178)