April 29, 2024

पुणे: जी-२० बैठकीच्या निमित्ताने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील पुण्याची प्रगती आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवावे- अपर सचिव अभिषेक सिंग

पुणे, 31 मे 2023: जी-२० राष्ट्रांच्या परिषदेच्या पार्श्वभूमीवर पुणे येथे १२ ते १४ जून दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ‘डिजीटल इकॉनॉमी वर्किंग ग्रुप’ बैठकीच्या आयोजनप्रसंगी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील पुण्याच्या प्रगतीचे प्रदर्शन करतानाच महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन परिषदेच्या सदस्यांना घडवावे, असे निर्देश केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या नॅशनल ई-गव्हर्नन्स डिव्हीजनचे अपर सचिव अभिषेक सिंग यांनी दिले.

जी-२० बैठकीच्या नियोजनासंबधी आढावा बैठक आज विधान भवन सभागृहात आयोजित करण्यात आली होती. बैठकीस केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सहसचिव सुशिल पाल, उपसचिव अनुपम आशिष चौहान, विभागीय आयुक्त सौरभ राव, महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार, पुण्याचे पोलीस आयुक्त रितेशकुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, उपायुक्त वर्षा लड्डा आदी उपस्थित होते.

सिंग म्हणाले, बैठकीच्या नियोजनामध्ये कोणतीही त्रुटी राहू याची दक्षता घ्यावी. पाहुण्यांना पालखी सोहळाच्या निमित्ताने आपल्या सांस्कृतिक वारशाची ओळख करून द्यावी. वारीबद्दल क्युआर कोड आणि घडीपुस्तिकेच्या माध्यमातून माहिती देण्यात यावी. जेवणाच्यावेळी महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृतीची देखील ओळख करून द्यावी, असे त्यांनी सांगितले.

बैठकीच्या आयोजनाच्या तयारीचा यावेळी त्यांनी आढावा घेतला. सर्व संबधित विभागांनी समन्वयाने कामे करावीत, पुण्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, ऐतिहासिक स्थळे, येथील खाद्यसंस्कृती, स्मार्ट सिटी, स्वच्छ पुणे, आदी वैविध्य जगासमोर आणण्याची संधी मिळाली असून त्यादृष्टीने नियोजन करण्यात यावे, अशी सूचना त्यांनी केली.

विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले, आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्वाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा प्रशासनाला मोठा अनुभव असून जानेवारी २०२३ मध्ये जी-२० प्रतिनिधींच्या पहिल्या बैठकीचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले. १२ ते १४ जून दरम्यान आयोजित बैठकीसाठी आवश्यक तयारी प्रशासनातर्फे सर्व विभागांच्या सहकार्याने सुरु आहे. परदेशातून येणाऱ्या पाहुण्यांना विमानतळ ते मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत पुण्याची वैशिष्ट्ये आणि क्षमता ठळकपणे दिसतील अशा पद्धतीने नियोजन करण्यात आले असून ऐतिहासिक व महत्वाची वारसा ठिकाणे, शैक्षणिक संकुल आदी ठिकाणी प्रतिनिधींच्या भेटींचे नियोजन केल्याची माहिती त्यांनी दिली. आषाढी वारी आणि बैठकीच्या आयोजनासंबधी ताळमेळ ठेवण्यात येत असून त्यादृष्टीने नियोजन केल्याचेही त्यांनी सांगितले.

महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी महानगरपालिकेतर्फे करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली. बैठकीच्या निमित्ताने शहर स्वच्छता, महत्वाच्या चौकांचे व मार्गाचे सुशोभीकरण आणि रात्री विद्युत रोषणाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बैठकीला विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

असे होईल पाहुण्यांचे स्वागत
बैठकीसाठी येणाऱ्या प्रतिनिधींचे विमानतळावर पारंपरिक महाराष्ट्रीय पद्धतीने सनई-चौघड्याद्वारे स्वागत करण्यात येणार आहे. विमानतळावरील सजावट करताना बैठकीच्या विषयाच्या अनुषंगाने डिजिटल संकल्पना केंद्रीत ठेवण्यात आली आहे. पाहुण्यांच्या सन्मानार्थ आयोजित भोजनाचेवेळी सांस्कृतिक कार्यक्रमात माँसाहेब जिजाऊ वंदन, दिंडी, शेतकरी नृत्य, मंगळागौर, गोविंदा, कोळी नृत्य, लावणी, धनगर नृत्य, गोंधळी आणि शिवराज्याभिषेक सोहळा सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.