पुणे, दि. २५ मार्च, २०२५ : प्रतिथयश तबलावादक प्रशांत पांडव यांच्या स्वर- नाद म्युझिक फाऊंडेशनच्या वतीने मराठी नवीन वर्षाचे औचित्य साधत गुढी पाडव्याच्या दिवशी रविवार, दि. ३० मार्च, २०२५ रोजी ‘चाहे कृष्ण कहो या राम’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे ६:३० वाजता मयूर कॉलनी मधील एम.ई.एस. बालशिक्षण मंदिराच्या सभागृहामध्ये सदर कार्यक्रम संपन्न होईल. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर त्यासाठी प्रवेश देण्यात येईल अशी माहिती यावेळी कार्यक्रमाच्या आयोजकांनी कळविली आहे. काही जागा या निमंत्रितांसाठी राखीव असतील याची कृपया नोंद घ्यावी.
हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचा प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशाने तबलावादक प्रशांत पांडव, त्यांचे शिष्य गीत इनामदार व किशोर पांडव यांनी स्वर- नाद म्युझिक फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली असून या अंतर्गत ‘चाहे कृष्ण कहो या राम’ या पहिल्याच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ३० मार्च रोजी होणाऱ्या कार्यक्रमाचे उद्घाटन पुणे महानगरपालिकेतील माजी विरोधीपक्ष नेते व आपला परिसरचे उज्ज्वल केसकर, प्रसिद्ध गायक व संवादिनीवादक प्रभाकर पांडव आणि प्रशांत इनामदार यांचे हस्ते संपन्न होईल.
सदर कार्यक्रमामध्ये पं विजय कोपरकर व विदुषी प्रतिमा टिळक यांच्या शिष्या गायिका श्रुती बुजारबरुआ- गोडबोले आणि पं. अजॉय चक्रबर्ती यांचे शिष्य व गायक अमोल निसळ यांचे गायन संपन्न होईल. यावेळी प्रशांत पांडव (तबला), उदय कुलकर्णी (संवादिनी), धवल जोशी (बासरी), विनीत तिकोणकर (पखवाज), क्षितिज भट (कीबोर्ड), उद्धव कुंभार (साईड रिदम) हे सहवादक साथसंगत करतील. कार्यक्रमाचे निवेदन रवींद्र खरे करणार आहेत.
‘चाहे कृष्ण कहो या राम’ या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाची निर्मिती आणि संकल्पना प्रसिद्ध तबला वादक प्रशांत पांडव यांची असून प्रभू श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यावर आधारित, शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, नाट्यसंगीत अशा संगीताच्या विविध रंगांनी नटलेली एक भक्तिरसपूर्ण सांगीतिक यात्रा या कार्यक्रमाद्वारे रसिक प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.
More Stories
माजी आमदार रवींद्र धंगेकरांवर समीर पाटीलने दाखल केला ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा
“बोट घातलं तर हात घालू, ॲक्शनला रिऍकशन मिळणार!” – अमित ठाकरे यांचा अभाविपला इशारा
Pune: अनधिकृत फ्लेक्सचा दंड नसल्यास उमेदवारी अर्ज बाद; उमेदवारांना घ्यावी लागणार एनओसी