May 18, 2024

२५, २६ नोव्हेंबर रोजी डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हलचे आयोजन

पुणे, दि. २० नोव्हेंबर, २०२३ : दखनी अदब फाउंडेशनच्या वतीने एकाहून एक सरस कविता, गझल्स, मुलाखती, चर्चासत्रे, नाटक आणि सांगीतिक कार्यक्रम यांची रेलचेल असलेल्या डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हलचे आयोजन येत्या शनिवार दि. २५ आणि रविवार दि. २६ नोव्हेंबर रोजी करण्यात आले आहे. जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी दोन्ही दिवशी सकाळी ११ ते रात्री ११ दरम्यान सदर महोत्सव संपन्न होणार असून यासाठी सर्वांना विनामूल्य प्रवेश देण्यात येईल. महोत्सवात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी संस्थेच्या संकेतस्थळावर आगाऊ नोंदणी करावी, असे आवाहन फाउंडेशनचे संचालक जयराम कुलकर्णी यांनी केले आहे.

महोत्सवाचे हे चौथे वर्ष असून दरवर्षीप्रमाणे प्रसिद्ध कलाकारांसोबतच नवोदित कलाकारांची कला रसिकांसमोर येण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ असावे, यासाठी फाउंडेशनच्या माध्यमातून विशेष प्रयत्न करण्यात आल्याचे देखील जयराम कुलकर्णी यांनी नमूद केले.

महोत्सवाविषयी अधिक माहिती देताना महोत्सवाच्या समन्वयक मोनिका सिंग म्हणाल्या, “सांस्कृतिक शहर अशी ओळख असलेल्या पुणे शहरात मराठी, हिंदी, उर्दू या भाषांमधील साहित्याचा उत्सव साजरा व्हावा, या उद्देशाने आम्ही डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हलला सुरुवात केली. दरवर्षी रसिक प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद आमचा उत्साह वाढविणारा आहे. याच उत्साहासोबत आम्ही यंदाच्या चौथ्या वर्षी अनेक सुप्रसिद्ध कलाकारांसोबत साहित्य, कविता, नाट्य, चर्चासत्रे, सांगीतिक कार्यक्रम यांचा खजिना रसिकांसाठी घेऊन आलो आहोत, याचा आनंद आहे.”

यावर्षी महोत्सवाची सुरुवात शनिवार दि २५ नोव्हेंबर रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे सकाळी ११ वाजता राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते, पटकथाकार आणि चित्रपट दिग्दर्शक सौरभ शुक्ला यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटनाने होईल. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव, फोर्स वनचे अतिरिक्त महासंचालक कृष्ण कुमार, प्रसिद्ध नाट्यकर्मी, नाट्यगुरू पद्मश्री वामन केंद्रे आणि ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके हे यावेळी उपस्थित असतील, अशी माहिती फाउंडेशनचे संचालक मनोज ठाकूर यांनी दिली.

उद्घाटनानंतर ‘सौरभ शुक्ला : एक सुगंधित प्रवाह’ हा कॉफी टेबल टॉकचा कार्यक्रम होईल. यामध्ये सलीम आरिफ हे सौरभ शुक्ला यांच्याशी संवाद साधतील. यानंतर ‘दोन शतकांच्या सांध्यांवरील मराठी कविता’ हा कार्यक्रम संपन्न होईल. यामध्ये वसंत आबाजी डहाके, नारायण कुलकर्णी, महेश केळुस्कर, इंद्रजित भालेराव, रमेश इंगळे, ममता सिंधुताई सपकाळ, बालाजी सुतार, दासू वैद्य, चंद्रशेखर कांबळे आदी कवी आपल्या कविता सादर करतील. सुरेशकुमार वैराळकर हे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतील. पहिल्या दिवसाच्या सायंकाळच्या सत्रात ‘शब्द संवाद – समकालीन हिंदी साहित्य’ या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत डॉ सुनील देवधर हे सुप्रसिद्ध साहित्यिक त्रिपुरारी शरण आणि डॉ शोभना जैन यांच्याशी संवाद साधतील. यानंतर पद्मश्री पं रामदयाल शर्मा यांचा ‘नौटंकी’ हा लोककलेवर आधारित कार्यक्रम होईल. यानंतर होणाऱ्या उपस्थितांना ‘पॉएट्री ऑफ यंगीस्तान’ या कार्यक्रमामध्ये कुशल धनौरीया, सावन शुक्ला, अमित झा राही, अंकित मौर्य, विनीत शंकर, झिशान साहीर, आयुष्य कश्यप या कवींच्या कविता ऐकण्याची संधी मिळेल. महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा समारोप `‘रंग- ग्रँड मुशाहिरा’ या कार्यक्रमाने होईल. यामध्ये वसीम बरेलवी, फेहमी बदायुनी, इक्बाल अशहर, मदन मोहन दानिश, अस्लम हसन, अजीज नबील, मोनिका सिंग, आलोक श्रीवास्तव, इरफान शाहनूरी, मुकेश आलम, प्रग्या शर्मा, संतुष एस सिंग, संध्या यादव यांचे सादरीकरण अनुभविता येईल.

महोत्सवाच्या दुसऱ्या (रविवार दि २६ नोव्हेंबर) दिवसाची सुरुवात सकाळी ११ वाजता ‘प्रा. वामन केंद्रे- एक व्रतस्थ समर्पित रंगकर्मी’ या कार्यक्रमाने होईल. यावेळी मृण्मयी भजक या पद्मश्री वामन केंद्रे यांच्याशी संवाद साधतील. यानंतर सुप्रसिद्ध लेखक आणि वक्ते देवदत्त पट्टनाईक यांचा ‘डिकोडिंग दी स्टोरीज ऑफ गॉड्स अँड सेंट्स’ हा संवादात्मक कार्यक्रम होईल. लेखिका सुधा मेनन या पट्टनाईक यांच्याशी संवाद साधतील. मराठी लेखकांशी गप्पांचा ‘मराठी साहित्यसंवाद – त्रिधारा’ हा कार्यक्रम यानंतर होईल. यामध्ये प्रवीण बांदेकर, मेघना पेठे, आसाराम लोमटे यांच्याशी रणधीर शिंदे हे संवाद साधतील. यानंतर लुब्ना सलीम आणि हर्ष छाया या कलाकारांचे ‘हमसफर’ हे हिंदी नाटक सादर होईल. प्रेम, कुटुंब आणि नातेसंबंध यांचे आयाम दाखविणारे, जावेद सिद्दीकी लिखित, सलीम आरिफ दिग्दर्शित हे नाटक रसिकांसाठी एक पर्वणी ठरेल.

दुसऱ्या दिवसाच्या सायंकाळच्या सत्राची सुरुवात मोनिका सिंग आणि कवी वैभव जोशी यांचा ‘हमनवा – कविता और गझल की मेहफिल’ हा कार्यक्रमाने होईल. पद्मश्री सुरेंद्र शर्मा यांच्या ‘हास्य कविता – मुझसे भला न कोई’ या कार्यक्रमाने रसिकांची रविवारची सायंकाळ रंगेल. महोत्सवाचा समारोप इमदादखानी घराण्याचे सुप्रसिद्ध संगीतकार आणि सतारवादक उस्ताद शुजात खान यांच्या ‘सुफी म्युझिकल इव्हिनिंग’ या सांगीतिक कार्यक्रमाने होईल.