पुणे, दि. ९ डिसेंबर, २०२४ : कापडाच्या तुकड्यांचा पुनर्वापर करीत साकारलेल्या कलाकृत व कथानक अनुभविण्याची संधी पुणेकर रसिकांना मिळणार आहे. निमित्त आहे आयजीए गॅलेरिया यांच्या वतीने बुधवार दि. १८ ते रविवार दि. २२ डिसेंबर, रोजी शिवाजीनगर येथील घोले रस्त्यावरील राजा रवी वर्मा कलादालनात आयोजित करण्यात येत असलेल्या ‘थ्रेड स्टोरी’ या प्रदर्शनाचे. सकाळी ११ ते सायं. ६.३० दरम्यान सदर प्रदर्शन हे रसिकांसाठी विनामूल्य खुले आहे.
‘थ्रेड स्टोरी’ प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन मंगळवार दि. १७ डिसेंबर रोजी, सायं ५ वाजता मेटाफर्समधील असोसिएट आर्किटेक्ट असलेल्या पौरवी महाजन, एएमपीएम डिझाइन्सच्या सहसंस्थापिका पूनम मेहता आणि आर्किटेक्टोनिक्स डिझाइन कन्सल्टन्सीमध्ये प्रिन्सिपल आर्किटेक्ट असलेल्या सोनाली ठोसर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होईल.
प्रदर्शनाबद्दल अधिक माहिती देताना अलका रोडे म्हणाल्या, “कापडाच्या तुकड्यांचा पुनर्वापर करीत कल्पनाशक्तीच्या मदतीने तयार केलेल्या कलाकृती हे ‘थ्रेड स्टोरी’ या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे. स्त्री, स्त्रीची विविध रूपे आणि तिच्या भोवतालचे जग अशी या प्रदर्शनाची संकल्पना असून या विषयाशी निगडीत कलाकृतींचा समावेश प्रदर्शनामध्ये करण्यात आला आहे. कथानकावर आधारलेली कलाकृतींची गुंतागुंत असलेली एक टेपेस्ट्री यामध्ये प्रेक्षकांना पाहता येणार आहे.”
एक प्रकारे अनुभवांचा संग्रहच यानिमित्ताने मी घेऊन येतीये. त्यामुळे प्रत्येक धागा हा वेगळी कथा आणि वेगळा दृष्टीकोन दर्शवित असला तरी एक समृद्ध असे बहुआयामी कथानक याद्वारे प्रेक्षकांना नक्की पहायला मिळेल, असा विश्वास अलका रोडे यांनी व्यक्त केली.
‘थ्रेड स्टोरी’ या प्रदर्शना दरम्यान १८, १९ व २० डिसेंबर रोजी सायं ४ ते ६ दरम्यान इच्छुकांना अलका रोडे यांच्याशी थेट संवाद साधता येणार असून कलाकारांचे एखाद्या कलाकृती मागील विचार या दरम्यान जाणून घेता येतील. याबरोबरच शनिवार दि. २१ डिसेंबर रोजी सायं ५ ते ६ दरम्यान कलाकार मनसा प्रिया धुलीपला, अपराजिता जैन महाजन आणि अलका रोडे यांसोबत शिल्पकार आणि कला सल्लागार असलेले इंद्रनील गरई हे संवाद साधतील. हे दोन्ही कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहेत.
अलका या स्वत: व्यावसायिक कलाकार असून ‘कथनात्मक कलाकृती’ साकारण्यावर त्यांचा भर आहे. त्यांचे औपचारिक शिक्षण हे जी. डी. आर्ट आणि एम. ए. फाईन आर्ट्समध्ये झाले असून त्यांची स्वत:ची आर्ट गॅलरी आहे. अर्बन स्केचर्स म्हणूनही त्या कार्यरत आहेत हे विशेष.

More Stories
मतदान करा, हेच खरे आवाहन ; अभिनेते प्रवीण तरडे यांचे मतदात्यांना आवाहन
अभिनेता सुबोध भावे यांनी पुणेकरांसोबत मतदानाचा हक्क बजावला
शाई पुसून मतदानाचा गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणार नाही