May 14, 2024

नादरूपच्या ३८ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘संचित’ या नृत्यमहोत्सवाचे आयोजन

पुणे, दि. २९ जानेवारी, २०२४ : संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध कथक गुरु शमा भाटे यांनी स्थापन केलेल्या नादरूप संस्थेला ३८ वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने येत्या २, ३ आणि ४ फेब्रुवारी रोजी ‘संचित’ या एकल कथक नृत्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि २ व ३ फेब्रुवारी रोजी सायं ५.३० ते ८.३० तर दि ४ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.०० – दुपारी १ पर्यंत मयूर कॉलनी येथील एम ई एस बालशिक्षण सभागृह या ठिकाणी सदर महोत्सव संपन्न होणार आहे. महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर त्यासाठी प्रवेश दिला जाईल.

महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी (दि. २ फेब्रुवारी) कथक केंद्राच्या सल्लागार समितीच्या अध्यक्षा आणि जयपूर घराण्याच्या सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना उमा डोगरा, तालयोगी पद्मश्री पं. सुरेश तळवलकर व इतर मान्यवर उपस्थित असतील. याबरोबरच बंगळुरूचे नृत्य अभ्यासक आशिष मोहन खोकर आणि दिल्लीच्या नृत्य, संगीत अभ्यासक असलेल्या मंजिरी सिन्हा या देखील उपस्थित असतील.

या संदर्भात अधिक माहिती देताना गुरु शमा भाटे म्हणाल्या, “३८ वर्षांपूर्वी नादरूप या संस्थेच्या माध्यमातून कथक नृत्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यास मी सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात एकल कथक नृत्य हे नृत्याचा महत्त्वपूर्ण भाग होते, याद्वारे नादरूपचे अनेक शिष्य तयार झाल्या आणि आज सुप्रसिद्ध नृत्यांगना म्हणून त्यांनी वेगळी ओळख मिळविली आहे. काळानुरूप सांघिक नृत्य प्रकारास पसंती मिळू लागली. तसे नादरूपने नृत्यदिग्दर्शनावर भर देत अनेक सांघिक कार्यक्रम तयार करीत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली वेगळी ओळख तयार केली. संस्थेच्या या वर्षीच्या वर्धापनदिनानिमित्त पुन्हा एकदा एकल नृत्याला केंद्रस्थानी ठेवत आम्ही ‘संचित’ या महोत्सवाचे आयोजन करीत आहोत. यामध्ये माझ्या १० शिष्यांचे एकल कथक सादरीकरण होणार आहे.”

या महोत्सवाअंतर्गत गुरु शमाताईंच्या शिष्यांचे एकल सादरीकरण होईल. प्रत्येक शिष्येने आपल्या सादरीकरणाची संकल्पना, नृत्यदिग्दर्शन स्वत: केले असून याद्वारे आपल्या गुरुंबद्दल त्या आदर व्यक्त करणार आहेत, अशी माहिती शमा भाटे यांच्या शिष्या अमीरा पाटणकर यांनी दिली. यामध्ये ईशा नानल, श्रद्धा मुखडे, श्रेया कुलकर्णी, शिवानी करमरकर, मुक्ती श्री, अवनी गद्रे, लीना केतकर, शीतल कोलवालकर, अमीरा पाटणकर, श्रीकला जोशी, शीतल कपोले, केतकी शाह, मानसी देशपांडे या शिष्या सादरीकरण करणार आहेत.

यासोबतच रविवार दि. ४ फेब्रुवारी रोजी नादरूपशी संबंधित सर्वांचेच एक अनौपचारिक संमेलन होणार असून यामध्ये गेल्या ३८ वर्षांत शमा ताई यांच्याशी जोडले गेलेले शिष्य, कलाकार, साथसंगतकार, विद्यार्थी, पालक, तंत्रज्ञ यांचा सहभाग असणार आहे.