October 14, 2025

येत्या २३ व २४ फेब्रुवारी रोजी १२ व्या आरोग्य चित्रपट महोत्सवाचे आयोजन

पुणे, दि. २० फेब्रुवारी, २०२४ : आरोग्यविषयक लघुपट व माहितीपटांच्या माध्यमातून जनजागृती करण्याच्या उद्देशाने पुण्यातील पी. एम. शहा फाउंडेशनच्या वतीने येत्या शुक्रवार दि. २३ आणि शनिवार दि. २४ फेब्रुवारी रोजी १२ व्या आरोग्य चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महोत्सवाचे संचालक अॅड चेतन गांधी यांनी दिली.

विधी महाविद्यालय रस्त्यावरील एनएफडीसीचे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे हा दोन दिवसीय महोत्सव संपन्न होईल. महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर त्यासाठी प्रवेश देण्यात येणार आहे.

यासंदर्भात अधिक माहिती देताना अॅड चेतन गांधी म्हणाले, “तरुणाईमध्ये कोणत्याही विषयासंदर्भात जनजागृती करीत असताना चित्रपट, लघुपट आणि माहितीपट हे माध्यम कायमच प्रभावी ठरते. हे होत असताना सर्जनशील आणि कल्पक युवा लेखक-दिग्दर्शक यांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे आणि आरोग्य विषयावरील अनेक पैलूंवर या माध्यमातून उहापोह व्हावा, चर्चा व्हावी आणि आरोग्याशी संबंधित अनेकविध विषय मांडता यावेत या उद्देशाने २००९ सालापासून पी. एम. शहा फाउंडेशनच्या वतीने या आरोग्य महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. याहीवर्षी आरोग्य आणि स्वच्छता या विषयांवरील तब्बल ४० चित्रपट, लघुपट आणि माहितीपट महोत्सवा अंतर्गत रसिक प्रेक्षकांना पाहता येणार आहेत.”

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी (२३ फेब्रुवारी) दु. २ वाजता राष्ट्रीय आरोग्य सेनेचे प्रमुख व स्मिता पाटील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संस्थापक संचालक डॉ अभिजित वैद्य यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होईल. यानंतर सायंकाळी ६ वाजेपर्यंत उपस्थित नागरीकांना महोत्सवाचा आस्वाद घेता येईल.

दुस-या दिवशी (२४ फेब्रुवारी) सकाळी १० वाजता महोत्सवाला सुरुवात होऊन सायं ४.३० वाजेपर्यंत महोत्सव सुरु असेल. यानंतर राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक वीरेंद्र वळसंगकर यांच्या उपस्थितीत महोत्सवाचा समारोप आणि बक्षीस वितरण समारंभ संपन्न होईल. यावेळी सर्वोत्कृष्ट लघुपट आणि माहितीपटांना पुरस्कार देखील देण्यात येईल, अशी माहिती अॅड चेतन गांधी यांनी दिली.

यावर्षी देशविदेशातून तब्बल १४५ पेक्षा जास्त लघुपट आणि माहितीपटांनी आपला सहभाग महोत्सवासाठी नोंदविला असून यापैकी निवडक ४० लघुपट व माहितीपट पाहण्याची संधी उपस्थितांना मिळणार आहे. यामध्ये मानसिक आरोग्य, लहान मुलांचे आरोग्य व बाललैंगिक शोषण, महिला आरोग्याचे प्रश्न, अवयवदान, कर्करोग, सामाजिक आरोग्य, स्वच्छता, ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य विषयक समस्या आदी विषयांचा समावेश आहे हे विशेष.

भारता सोबतच जगभरातून दुबई, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, अमेरिका, पाकिस्तान, अल्जेरिया, इंग्लंड, बांग्लादेश, सेनेगल, फिलिपिन्स, फ्रान्स, ओमान, आणि इराण या देशांतून प्रवेशिका आल्या आहेत. या सर्व माहितीपट आणि लघुपटांच्या निवड प्रक्रियेचे काम प्रख्यात समीक्षक, आणि सामाजिक कार्यकर्त्या अनुजा देवधर, प्रसिद्ध दिग्दर्शक विनय जवळगीकर, मानसिक आरोग्याच्या अभ्यासक सुखदा ख्रिस्ती यांनी केले आहे. महोत्सवात दाखविण्यात येणारे लघुपट, माहितीपट हे विविध भाषांमधील असले तरीही त्यासाठी इंग्रजी सबटायटल्स असणार आहेत अशी माहिती गांधी यांनी दिली.