पुणे, १८ मार्च २०२५: “माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह पूर्ण शेतीवर चालतो. आई-वडील दोघे शेती करतात. आम्ही दोघे भाऊ पुण्यात शिक्षण घेत आहोत. मी विधी महाविद्यालय आयएलएस महाविद्यालयात तर मोठा भाऊ फिरोदिया महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. महाविद्यालयातील शिक्षण शुल्क अधिक असून, दोघांच्या राहण्याचा व जेवणाचा खर्च, यामुळे आमच्या कुटुंबला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय.” असं हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर या छोट्याखानी खेड्यातील शेतकरी कुटुंबातील मुलगा हर्षवर्धन शिंदे सांगतो.
‘पूर्वेकडील ऑक्सफर्ड’ म्हणून ओळखले जाणारे पुणे, महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचे प्रवेशद्वार बनण्याचे आश्वासन देऊन आकर्षित करते. मात्र, शहराच्या दोलायमान शैक्षणिक दर्शनामागे एक वास्तव दडलेले आहे. जीवनावश्यक खर्चातील सततची वाढ, अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणीत ढकलत आहे. याच पार्श्वभूमीवर उच्च शिक्षण घेत असलेल्या काही विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. तसेच शिक्षण घेत असताना उद्भवणाऱ्या त्यांच्या आर्थिक संघर्षाच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला आहे.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिक्षण व भविष्यात चांगल्या नोकरीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुण्यात दाखल होतात. विशेषत: मराठवाडा, विदर्भ दुष्काळी भागातून आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक असते. याचे मुख्य कारण म्हणजेच या भागातील दुष्काळ, पावसाळ्या दरम्यान अतिवृष्टी तर कधी पूर अशा परिस्थिती, त्याचबरोबर आर्थिक समस्या देखील आहेत.
स्वप्न चांगल्या शिक्षणाचे –
उच्च शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या या तरुण-तरुणींना चांगले शिक्षण व त्याद्वारे चांगल्या नोकरीची अपेक्षा असते. त्यामुळे शेती करणे हाच एकमेव पर्याय त्यांच्या समोर राहत नाही. अशी प्रतिक्रिया काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिली आहे.
विद्येचे माहेरघर बनले आर्थिक संघर्षाचे केंद्रबिंदू –
विद्येचे माहेरघर असलेले पुणे, हे ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी आर्थिक संघर्षाचा केंद्रबिंदू बनले आहे. वाढत्या महागाईमुळे शिक्षणाचा खर्च गगनाला भिडला आहे. कॉलेजची फी, राहण्याचा खर्च वाढल्याने शिष्यवृत्ती वरती तग धरणे कठीण झाले आहे. अर्धवेळ काम करूनही नोकरीच्या संधी कमी आहेत. त्यात शिक्षणाचे बाजारीकरण वाढल्याने ग्रामीण विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न अपूर्ण राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने तातडीने उपाययोजना करून विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती वाढवणे शैक्षणिक संस्थांची फी कमी करणे आणि नोकरीच्या संधी उपलब्ध करणे गरजेचे आहे. अन्यथा ‘पूर्वेकडील ऑक्सफर्ड’ ही पुण्याची ओळख केवळ नावापूरती उरेल.
मागील सहा वर्षापासून पुण्यात शिक्षण घेत आहे. फर्ग्युसन महाविद्यालयातून कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिथूनच बी.ए. जर्मन पूर्ण केले. या शहराने माझ्या व्यक्तिमत्त्वात अनेक बदल घडवून आणले, यात शंका नाही. साध्या झेरॉक्सपासून ते वह्या- पुस्तके तसेच रूमचे भाडे अशा सगळ्या गोष्टी महागल्या आहेत. पुण्याचे वातावरण शिक्षणासाठी पोषकच आहे, परंतु महाविद्यालयाच्या नावावरून खेड्यापाड्यातून जी मुले इथे शिकायला येतात, त्यांना त्या दर्जाचे शिक्षण मिळते का? हा मोठा प्रश्न आहे.
– तुषार वराट, विद्यार्थी, गेवराई (बीड)
“मागील दोन वर्षांपासून पुण्यात आहे आणि सध्या मॉडर्न महाविद्यालयात बी.बी.ए च्या द्वितीय वर्षात आहे. सामाजिक आणि आर्थिक भान पुण्यात आल्यानंतर मिळाले. महाविद्यालयाचे शिक्षण शुल्क, त्याचबरोबर जेवणाचा आणि राहण्याचा खर्च खुप आहे. त्यात महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. हा संपूर्ण खर्च शिष्यवृत्ती आणि पालकांद्वारे पाठवण्यात येणाऱ्या पैशातून भागवत आहे. शिक्षणासाठी लागणाऱ्या पुस्तकांपासून ते स्टेशनरी पर्यंत अशा प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवर पैसे खर्च करताना अनेकदा विचार करावा लागतो. अनेकदा इच्छा असून देखील काही आगाऊ खर्च करता येत नाही. अन्यथा महिनाअखेर आर्थिक गणित बिघडते, आणि घरच्यांनाही अधिक पैसे मागता येत नाही. शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती वेगवेगळी असते. काही जण शिष्यवृत्तीवर किंवा पार्ट टाइम काम करूण शिक्षण घेतात. मात्र आता नोकरीच्या संधी देखील कमी असून स्पर्धा वाढली आहे.”
– ओमकार पारिस्कर, विद्यार्थी, रिसोड (वाशीम)
More Stories
माजी आमदार रवींद्र धंगेकरांवर समीर पाटीलने दाखल केला ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा
“बोट घातलं तर हात घालू, ॲक्शनला रिऍकशन मिळणार!” – अमित ठाकरे यांचा अभाविपला इशारा
Pune: अनधिकृत फ्लेक्सचा दंड नसल्यास उमेदवारी अर्ज बाद; उमेदवारांना घ्यावी लागणार एनओसी