पिंपरी, १३ जून २०२५ ः पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने नागरिकांना ३० जून २०२५ पूर्वी मालमत्ता कर भरण्याचे आवाहन केले असून, वेळेत कर भरल्यास विविध सवलतींचा लाभ मिळणार आहे. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या कर संकलन विभागाने यासाठी विशेष मोहीम राबवली आहे.
महापालिकेच्या अधिकृत वेबसाइट किंवा मोबाईल ॲपद्वारे ऑनलाइन कर भरल्यास नागरिकांना थेट १० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जात आहे. याशिवाय, महिलांच्या नावावर नोंद असलेल्या मालमत्तांना ३० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जात असून, ही योजना महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
महापालिकेने पर्यावरणपूरक उपक्रम राबविणाऱ्या गृहनिर्माण संस्था, दिव्यांग व्यक्तींच्या नावावर असलेल्या मालमत्ता, तसेच महिलांच्या नावावर असलेल्या मालमत्तांना कर सवलतीचे धोरण राबवले आहे. त्यामुळे अनेक नागरिक या योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे सरसावत आहेत.
ऑनलाईन पद्धतीला उत्स्फूर्त प्रतिसाद-
आतापर्यंत जवळपास १ लाख ८९ हजार ८२३ नागरिकांनी ऑनलाइन व्यवहाराच्या माध्यमातून १८९.५२ कोटी रुपये जमा केले असून, त्यांना सवलतीचा लाभ मिळाला आहे. या संख्येत सातत्याने वाढ होत असून, महापालिकेच्या ऑनलाइन कर प्रणालीला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
थकीत करदारांवर कारवाईचा इशारा-
महापालिकेकडे सध्या सुमारे ७६ हजार ६८८ मालमत्ताधारकांकडून एकूण ४९८ कोटी रुपयांचा थकीत कर बाकी आहे. यासंदर्भात संबंधित मालमत्ताधारकांना थकबाकीची बिले आणि जप्तीपूर्व नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. कर न भरल्यास नियमानुसार मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशारा कर संकलन विभागाने दिला आहे.
महापालिकेने जलद, पारदर्शक आणि लोकाभिमुख सेवा देण्यासाठी ‘मालमत्ता कर भरणा’, ‘थकबाकी नसल्याचा दाखला’ यांसारख्या सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या आहेत.
याबाबत पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी सांगितले की, “शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पायाभूत सुविधा, स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठा आदी क्षेत्रात सातत्याने काम सुरू आहे. यासाठी आवश्यक निधीचा एक महत्त्वाचा स्रोत म्हणजे मालमत्ता कर. नागरिकांनी वेळेत कर भरून विकास प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा. ३० जूनपूर्वी मिळणारी सवलत ही नागरिकांसाठी एक सुवर्णसंधी आहे.”
“महापालिकेच्या वतीने करदात्यांना जलद, पारदर्शक आणि सुलभ सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ऑनलाइन पद्धतीने कर भरल्यास १० टक्के सवलत, महिलांच्या नावावर मालमत्ता असल्यास ३० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाते. मात्र थकीत कर न भरल्यास जप्तीची कारवाई होणार आहे, याची नोंद घ्यावी.” असे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी नमूद केले.
More Stories
Pune: चाकण भागातील सव्वादोनशे अतिक्रमणावर हातोडा
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या १४१ शाळांमध्ये आफ्टर-स्कूल मॉडेलची सुरुवात
PCMC: ३० सप्टेंबरपूर्वी ऑनलाइन मालमत्ता कर भरा आणि मिळवा ४ टक्के सवलत!