पुणे, दि.२६/०६/२०२५: पुणे शहर परिसरात नागरी समस्या दिवसेंदिवस वाढत असून त्या सोडवण्याच्या दृष्टीने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने नियोजन करावे, असे निर्देश राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी दिले. गुरुवारी (दि.२६) पीएमआरडीए कार्यालयात त्यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी पीएमआरडीएअंतर्गत सुरू असलेल्या तसेच प्रस्तावित विकास कामांबद्दल त्यांना सविस्तर माहिती दिली.
नागरी सुविधा आणि वाहतूक कोंडीमुळे पुणेकर हैराण आहे. त्यामुळे या समस्येकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे राज्यमंत्री मिसाळ यांनी बैठकीत स्पष्ट केले. त्या अनुषंगाने महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, मुख्य अभियंता रिनाज पठाण यांनी सध्या सुरू असलेल्या विविध विकास कामांसह मिसिंग लिंक, औद्योगिक कनेक्टिव्हिटी, पर्यटन व धार्मिक स्थळांचा विकास, अर्बन ग्रोथ सेंटर, रिंग रोड कनेक्टिव्हिटी यासह विविध भागात सुरू असलेल्या रस्ते विकास कामांसह इतर प्रकल्प आणि योजनांबाबत राज्यमंत्री यांना सविस्तर माहिती दिली.
पुणे शहराच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी आखण्यात आलेल्या विविध योजना, रस्ते विकासाचे नियोजन, गत काही वर्षांत राबविण्यात आलेल्या प्रकल्पांची सध्यस्थिती तसेच पुणे रिंग रोडच्या प्रगतीवर चर्चा झाली. शहरातील विविध भागांत प्रभावी कनेक्टिव्हिटी निर्माण करण्यासह मुख्यमंत्री – 100 दिवसांच्या उद्दिष्टांच्या यशस्वी साध्यतेसह पुढील 150 दिवसांच्या कार्यक्रमाचे नियोजन व त्यातून साध्य होणाऱ्या उद्दिष्टांवरही यावेळी चर्चा करण्यात आली.
या बैठकीला पीएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, पोलीस अधीक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल तांबे, विकास परवानगी व नियोजन विभागाचे संचालक सुनील मरळे, मुख्य अभियंता रिनाज पठाण, सह आयुक्त पूनम मेहता, वित्तीय नियंत्रक पद्मश्री तळदेकर यांच्यासह सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

More Stories
मतदान करा, हेच खरे आवाहन ; अभिनेते प्रवीण तरडे यांचे मतदात्यांना आवाहन
अभिनेता सुबोध भावे यांनी पुणेकरांसोबत मतदानाचा हक्क बजावला
शाई पुसून मतदानाचा गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणार नाही