पुणे, ११ जून २०२५ : मावळ तालुक्यातील आणि लोणावळा परिसरातील ऐतिहासिक गड-किल्ले, धबधबे, धरणे व इतर पर्यटनस्थळांवर ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-२०२३ च्या कलम १६३ नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डूडी यांनी हे आदेश जारी केले आहेत.
पर्यटकांची गर्दी आणि सुरक्षेचा प्रश्न
लोणावळा परिसरातील एकविरा देवी, कार्ला व भाजे लेणी, भाजे धबधबा, लोहगड, विसापूर, तिकोणा किल्ला, टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट, शिवलिंग पॉईंट तसेच पवना धरण या ठिकाणी दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होत असते. नागरिकांची सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही पावले उचलल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या कृतींवर बंदी
प्रशासनाने खालील कृतींवर स्पष्ट बंदी घातली आहे:
पावसामुळे धोकादायक ठरलेल्या धबधब्यांमध्ये उतरणे, पोहणे, पाण्याखाली बसणे
कठडे, वळणे, खड्डे, दऱ्यांच्या किनाऱ्यावर सेल्फी/चित्रिकरण करणे
धबधब्याच्या परिसरात मद्यपान, मद्य वाहतूक, बाळगणे व उघड्यावर सेवन
रस्त्यांवर व धोकादायक ठिकाणी वाहने थांबवणे, वेगाने वाहन चालवणे, ओव्हरटेक करणे
कचरा, प्लास्टिक, काच, थर्माकॉल उघड्यावर फेकणे
महिलांशी असभ्य वर्तन, शेरेबाजी, अश्लील हावभाव किंवा छेडछाड
सार्वजनिक ठिकाणी डिजे, स्पीकर, वूफर वापरून मोठ्या आवाजात संगीत वाजवणे
वायू, जल व ध्वनीप्रदूषण करणारी कोणतीही कृती
याशिवाय धबधबे, धरणे आणि नदी परिसरात सर्व प्रकारची वाहने (दुचाकी, चारचाकी, सहाचाकी) घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनांना यामध्ये सूट देण्यात आली आहे.
फलक, पोलिस बंदोबस्त, कडक कारवाई:
प्रत्येक पर्यटनस्थळी नियमांचे पालन होण्यासाठी पोलिस बंदोबस्त, सूचना फलक आणि रस्त्यावर नाकाबंदी केली जाणार असल्याची माहितीही प्रशासनाने दिली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम २२३ नुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
पर्यटकांनी पावसाळी पर्यटन करताना नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.
More Stories
माजी आमदार रवींद्र धंगेकरांवर समीर पाटीलने दाखल केला ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा
“बोट घातलं तर हात घालू, ॲक्शनला रिऍकशन मिळणार!” – अमित ठाकरे यांचा अभाविपला इशारा
Pune: अनधिकृत फ्लेक्सचा दंड नसल्यास उमेदवारी अर्ज बाद; उमेदवारांना घ्यावी लागणार एनओसी