January 18, 2026

पुणे: महापालिकेच्या शिष्यवृत्तीसाठी १० हजार अर्ज पात्र

पुणे, १३ जानेवारी २०२५: महापालिकेकडून शहरातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दिल्या जाणार्‍या शिष्यवृत्तीसाठी आलेल्या १३ हजार ६३८ अर्जांपैकी १९ हजार १२८ अर्ज पात्र झाले आहेत. तर २ हजार ६४७ अर्ज अपात्र ठरले आहेत. अर्ज अपात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनी त्वरीत त्रुटींची पूर्तता करावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

समाजविकास विभागाकडून महापालिका हद्दीत राहणार्‍या दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न मौलाना अबूल कलाम आझाद या नावाने १५ हजार रुपये, तर बारावीतील गुणवंतांसाठी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने २५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. यासाठी दहावी व बारावीमध्ये खुल्या गटातील विद्यार्थ्यांनी ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहेत. तर महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी, मागासवर्गीय विद्यार्थी आणि ४० टक्के अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना ६५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळणे आवश्यक आहे.

या योजनेसाठी लाभ घेण्यासाठीची अंतिम मुदत ३१ जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. दहावी उत्तीर्ण झालेल्या १० हजार १४७ विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत अर्ज केले आहेत. यातील दोन हजार अर्ज अपात्र ठरले असून ७ हजार ४९७ अर्ज पात्र ठरले आहेत. तर ६५० अर्जांची छाणनी करणे बाकी आहे. तर बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ३ हजार ४९१ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यातील २ हजार ८४४ अर्ज पात्र ठरले असून ७४७ अर्ज अपात्र झाले आहेत. तर २१३ अर्जांची छाननी बाकी आहे.

या दोन्ही योजनांचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागतो. त्यानंतर आवश्यक ती कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर त्याची शहानिशा करून संबधित अर्ज पात्र ठरविला जातो. आवश्यक ती कागदपत्रे न दिल्यास, तीन अपत्य तसेच या योजनेचा फायदा घेण्यासाठी आवश्यक असलेले गुण नसल्यास संबधित अर्ज अपात्र ठरविला जातो. त्यानंतर अर्जदाराने आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर त्याला देखील याचा फायदा मिळू शकतो, असे समाज विकास विभागाचे उपायुक्त नितीन उदास यांनी सांगितले. येत्या ३१ जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहेत. तसेच अपात्र ठरलेल्या अर्जांची पुर्तता करण्यासाठी संधी देखील मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

समाज विकास विभागाचे उपायुक्त नितिन उदास म्हणाले,” दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेसाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात चालू वर्षासाठी १७ कोटीची तरतूद आहे. या योजनेसाठी ३१ जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. आतापर्यंत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात काही दिवसात रक्कम जमा होईल.”