September 17, 2024

पुणे: बारावीतील युवतीची आत्महत्या, मोबाइलवरुन वडिलांनी खडसावले

पुणे, १०/०५/२०२३: वडिलांनी खडसावल्यामुळे बारावीतील युवतीने इमारतीच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील घोडेगाव परिसरात घडली.

भूमी सोनवणे (वय १९, रा. घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. भूमी बारावीत शिकत होती. तिचे वडील व्यावासायिक आहेत. बारावीचे वर्ष असल्याने तिला वडिलांनी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितले होते. सारखा मोबाइल पाहू नको, असे तिला वडिलांनी सांगितले. वडील ओरडल्याने भूमी रात्री इमारतीच्या छतावर गेली. तिने छतावरून उडी मारून आत्महत्या केली. सकाळी भूमी इमारतीच्या आवारात गंभीर जखमी अवस्थेत पडल्याचे सोनवणे कुटुंबीयांनी पाहिले. तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.

या प्रकरणी घोडेगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा घोडेगाव पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.