पुणे,२७ जुलै २०२४: शहरातील पुरस्थितीमुळे नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरून त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याबरोबरच प्रमुख रस्ते, अंतर्गत रस्ते, सोसायट्यांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात चिखल, गाळ साठला होता. शनिवारी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून पुरबाधित परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तसेच ठाणे पनवेल महापालिकेतून सुद्धा स्वच्छता कर्मचारी मदतीला पुण्यात आलेले आहेत त्यामध्ये २२८ टन कचऱ्यासह २६ टन गाळ व ३३ टन झाडपडीचा कचरा उचलण्यात आला. रस्ते, घरे, दुकाने, सोसायट्यांचा परिसर यावेळी स्वच्छ करण्यात आला.
खडकवासला धरणाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने गुरुवारी पहाटे खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात आले होते. प्रशासनाकडून नागरिकांना त्याबाबतची माहिती वेळेत मिळाली नाही. त्यामुळे नदीकाठच्या सोसायट्या, घरे, वस्त्यांमध्ये पाणी शिरून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. याबरोबरच स्थानिक बाजारपेठा, प्रमुख रस्ते, अंतर्गत रस्ते, सोसायट्यांचा परिसर, सोसायट्यांच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये कचरा, चिखल, गाळ साठला होता. त्यामुळे संबंधित ठिकाणांवर स्वच्छता करणे महत्त्वाचे होते. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभाग, आपत्ती निवारण कक्ष, सर्व क्षेत्रीय कार्यालयांकडून दोन दिवसांपासून नागरिक वास्तव्यास असणाऱ्या ठिकाणांची स्वच्छता केली जात होती. मात्र अनेक सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात होते.
दरम्यान, महापालिका प्रशासनाला शनिवारी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान या स्वयंसेवी संस्थेची मदत मिळाली. संस्थेचे स्वयंसेवक व महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी अशा २ हजार ३०४ जणांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. यावेळी महापालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज पी.बी, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम, उपायुक्त किशोरी शिंदे, जयंत भोसेकर, संजय शिंदे आदी उपस्थित होते. महापालिका प्रशासन व संबंधित संस्थांच्या स्वयंसेवकांकडून सिंहगड रस्त्यावरील एकता नगर, आदर्श नगर, मातोश्री रमाबाई आंबेडकर रस्ता, येरवडा, औंध या परिसरात स्वच्छता करण्यास प्राधान्य देण्यात आले. परिसरातील रस्ते, बाजारपेठा, दुकाने, सोसायट्या, नागरिकांच्या घरांमधील चिखल, गाळ व कचरा स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने काढण्यात आला. जेंटिंग मशिन, जेसीबी मशिनद्वारे खोलवर स्वच्छता करण्यात आली. कीटक प्रतिबंधात्मक औषधांची फवारणीही करण्यात आली. स्थलांतरित करण्यात आलेल्या नागरिकांना पिण्याचे पाणी, जेवण, फिरत्या शौचालयांचीही व्यवस्था करण्यात आली. याबरोबरच आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात आली.
———-
इथे झाली स्वच्छतेची कामे
डेक्कन जिमखाना भिडे पूल, पुलाची वाडी, पाटील इस्टेट, संगमवाडी, तपोधाम-कर्वेनगर, सिंहगड रोड, निंबजनगर, आदर्श नगर, सनसिटी उड्डाणपूल, फुलेनगर, विश्रांतवाडी, शांतिनगर झोपडपट्टी, मुळा रोड वसाहत.
——-
स्वच्छतेसाठी लागलेली साधने/वाहने
– जेसीबी – ९६
– डीपी – ४०
– बीआरसी – ५०
– हायवा – ८
– जेंटिंग मशिन – ३५
– घंटागाड्या – १२१
– छोटी वाहने – २९४
– कॉम्पेक्टर – १२१
– बीन लिफ्टर – ९६
– टिपर – ४०
More Stories
Pune: अनधिकृत फ्लेक्सचा दंड नसल्यास उमेदवारी अर्ज बाद; उमेदवारांना घ्यावी लागणार एनओसी
पुणे: पालिकेचा दिवाळी बचत बाजार गजबजला – दोन दिवसांत १९ लाखांची विक्री
Pune: नागरिकांच्या समस्या निराकरणासाठी पीएमआरडीएची तालुकानिहाय ९ क्षेत्रीय कार्यालये सुरु