June 24, 2024

पुणे: नात्यातील तरुणाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार – धमकावून ३० लाख रुपये उकळले

पुणे, २७/०८/२०२३: अल्पवयीन असताना नात्यातील तरुणाने मुलीवर अत्याचार केले. मोबाइलवर चित्रीकरण केल्यानंतर तिला धमकावून ३० लाख रुपये उकळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी तरुणासह त्याच्या नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत एका १९ वर्षीय तरुणीने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, तरुणासह त्याची आई, वडील, मावस बहिणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण आणि तरुणी नातेवाईक आहेत. ती अल्पवयीन असताना तरुणाने तिच्यावर अत्याचार केले. तिची छायाचित्रे मोबाइलवर काढली. याबाबत तिने तरुणाच्या कुटुंबीयांकडे तक्रार केली होती. त्यानंतर छायाचित्रे समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी देऊन तरुणाने तिला धमकावून अत्याचार केले.

तरुणीने घरातील सोन्याचे दागिने गहाण ठेवले तसेच मुदतठेव मोडून ३० लाख रुपये जमा केली. ही रक्कम तिने तरुणाच्या बँक खात्यावर पाठविली. त्यानंतर आरोपी तरुण तिला धमकावत होता. त्याच्या त्रासामुळे तरुणीने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली.