July 27, 2024

पुणे: ऑनलाईन जॉब पडला ९७ लाखांना सायबर चोरट्याने केली फसवणूक

पुणे, दि. ४/०५/२०२३: ऑनलाईन जॉब मिळवून देत भरपूर कमिशन  देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्याने एकाला तब्बल ९७ लाखांचा गंडा घातला आहे. ही घटना सप्टेंबर ते नोव्हेंबर २०२२ कालावधीत बावधनमध्ये घडली आहे. याप्रकरणी अनिल रेवणकर (वय ५६) यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनिल हे बावधन परिसात राहायला असून सप्टेंबर २०२२ मध्ये एकाने त्यांना टेलीग्रामवर मेसेज केला. सीटीएम कंपनीने ट्रॅव्हल रेटींगसाठी प्रवास ठिकाणांना फाईव्ह स्टार मिळवून दया, असा ऑनलाईन जॉब असल्याचे आमिष दाखविले. त्यानंतर सीटीएम कंपनीचे  प्रतिनिधी म्हणून मीरा पटेल आणि सुधा चव्हाण यांनी अनिल यांच्यासोबत संवाद साधत विश्वास संपादित केला. त्यांनी खोटे जॉब प्रोफाईल तयार करुन खरे असल्याचे भासवित अनिल यांची फसवणूक केली.

ऑनलाईन जॉब आणि भरपूर कमीशन देण्याच्या आमिषाने वेळोवेळी रक्कम भरण्यास प्रवृत्त करीत तब्बल ९६ लाख ५८ हजारांची फसवणूक केली. याप्रकरणी तक्रार अर्ज दाखल केल्यानंतर तपासाअंती सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक सावंत तपास करीत आहेत.