पुणे, २६/०५/२०२३: पश्चिम महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्ट या शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थ्यांकडून घेण्यात येणारे शैक्षणिक शुल्क संस्थेत जमा न करता अपहार केल्या प्रकरणी आठ जणांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला.
तबस्सुम अन्वर शेख (वय ४८),अन्वर नजीमुल्ला शेख (वय ५५, दोघे रा. लष्कर), तरन्नूम कादर सय्यद (वय ४३),काद छोटेमियाँ सय्यद (वय ५२, रा. लोणावळा), ताजेमा खान (वय ४२), सोहेल इस्माइल खान (वय ४८, रा. अमार सोसायटी, कोंढवा), अमिन आरीफ शेख (वय ३७), आरिफ शेख (वय ४०) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत जुबेर रशीद खान (वय ४४, रा. मेलोनी पार्क सोसायटी, नाना पेठ) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जुबेर खान पश्चिम महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आहेत. कोंढव्यातील मीठानगर भागात शैक्षणिक संस्था आहे.
शैक्षणिक संस्थेच्या अंतर्गत असलेल्या संस्थांच्या कागदपत्रांवर आरोपींनी बनावट स्वाक्षरी केली. खान तसेच त्यांच्या आईची बनावट स्वाक्षरी करुन जवाद शेख या शिक्षकाची अनुदानित पदावर नियुक्ती केली. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेली एक महिला कर्मचारी आजारी होती. तिने संस्थेच्या कागदपत्रांवर सही केल्याचे खान यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
विद्यार्थ्यांकडून जमा करण्यात आलेले ५० लाखांचे शुल्क जमा केले नाही. संस्थेची फसवणूक, तसेच अपहार केल्या प्रकरणी खान यांनी न्यायालयात तक्रार दिली होती. न्यायालयाच्या आदेशाने या प्रकरणी फसवणूक, अपहार, बनावट कागदपत्रे तयार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक मोहिते तपास करत आहेत.

More Stories
मतदान करा, हेच खरे आवाहन ; अभिनेते प्रवीण तरडे यांचे मतदात्यांना आवाहन
अभिनेता सुबोध भावे यांनी पुणेकरांसोबत मतदानाचा हक्क बजावला
शाई पुसून मतदानाचा गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणार नाही