September 17, 2024

पुणे: अश्लील ध्वनीचित्रफित प्रसारित करण्याची ज्येष्ठाला धमकी, साडेचार लाखांची खंडणी उकळल्या प्रकरणी गुन्हा

पुणे, ३०/०३/२०२३: समाजमाध्यमातून झालेल्या ओळखीतून ज्येष्ठ नागरिकाला धमकावून त्याच्याकडून चार लाख ६६ हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी खंडणी उकळणाऱ्या आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार शिवाजीनगर भागातील माॅडेल काॅलनी परिसरात राहायला आहेत. ते खासगी कंपनीतून निवृत्त झाले आहेत. त्यांच्या मोबाइल क्रमांकावर एका महिलेने संपर्क साधला. त्यानंतर महिलेने गोड बोलून त्यांना जाळ्यात ओढले. त्यानंतर तरुणी आणि साथीदारांनी ज्येष्ठाला धमकावण्यास सुरुवात केली. त्यासाठी आरोपींनी वेगवेगळे मोबाइल क्रमांक वापरले. अश्लील ध्वनीचित्रफित समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी दिली.

त्यानंतर ज्येष्ठ नागरिकाकडून आराेपींनी वेळोवेळी चार लाख ६६ हजार रुपये उकळले. आरोपींकडून त्यांना धमकावण्याचे प्रकार सुरु होते. त्यांच्या धमक्यांमुळे घाबरलेल्या ज्येष्ठ नागरिकाने सायबर गुन्हे शाखेत तक्रार अर्ज दिला. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण तपास करत आहेत.