May 18, 2024

पुणे: क्रांती दिनाच्या आंदोलनात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून सामाजिक कार्यकर्त्याला मारहाण

पुणे, ९ ऑगस्ट २०२३: क्रांतीदिनाचे निमित्त साधत प्रलंबित समस्यांना तोंड फोडण्यासाठी काही नागरिकांनी बुधवारी महापालिका भवनाला घेराव घातला. यावेळी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि संयोजकांमध्येच वादावादी झाली. आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेल्या कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांवरच संयोजकांनी टीका सुरू केली. त्यावर कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी माइक हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला.

सामाजिक कार्यकर्ते रुपेश केसेकर आणि अमित सिंग यांनी या आंदोलनाचे आयोजन केले होते. यावेळी आंदोलकांना समर्थन देण्यासाठी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे कार्यकर्त्यांसह आंदोलनात सहभागी झाले. यावेळी संयोजकांनी आपेक्ष घेत राजकीय पक्ष आंदोलनाचे श्रेय घेत असल्याची टीका केली. त्याला कॉंग्रेस शहराध्यक्षांनी आक्षेप घेत “माइकवर न बोलता आमच्याशी चर्चा करावी’ अशी भूमिका घेतली. त्यानंतर कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी माइक हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी केसेकर आणि कॉंग्रेस कार्यकर्त्यांत धक्काबुक्की झाली. अचानक हा वाद सुरू झाल्याने सुरक्षा रक्षकांनी मध्यस्थी केली. याबाबत बोलताना केसेकर म्हणाले की, आम्ही नागरिकांच्या वतीने हे आंदोलन आयोजित केले होते. कोणत्याही राजकीय पक्षाला या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आलेले नव्हते. तरीही कॉंग्रेसचे पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले. त्यामुळे त्यांना निघून जाण्याबाबत मी स्वत: सूचना केल्या मात्र,त्यांनी माझ्याशी हुज्जत घालत मला धक्काबुक्की केली.

“घेरावात सहभागी होण्याचे निमंत्रण सामाजिक संघटनांनी आम्हाला दिले होते. यापूर्वीही नदीकाठ योजना, वृक्षतोड, बालभारती रस्ता आंदोलनात आम्ही सहभागी होतो. त्यानुसारच आम्ही आजही गेलो. मात्र, आमच्यावरच टीका करण्यात आली. आम्ही आक्षेप घेतला. आम्हाला बोलू द्यावे अशी मागणी केली. मात्र, माइक दिला जात नसल्याने कार्यकर्त्यांनी तो हिसकावण्याचा प्रयत्न केला” – अरविंद शिंदे, शहराध्यक्ष, कॉंग्रेस