October 14, 2024

पुणे: आईच्या प्रियकराकडून अल्पवयीन मुलींवर अत्याचार – सामाजिक संस्थेतील समुपदेशनात अत्याचाराला वाचा

पुणे, १८/०६/२०२३: पतीच्या निधनानंतर प्रियकरासोबत राहणाऱ्या महिलेच्या दोन अल्पवयीन मुलींवर प्रियकराने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. अल्पवयीन मुलींना सामाजिक संस्थेत ठेवण्यात आले होते. सामाजिक संस्थेतील समुपदेशनात अत्याचाराला वाचा फुटली. या प्रकरणी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल कऱ्ण्यात आला आहे.

याबाबत एका सामाजिक संस्थेतील स्वयंसेवक महिलेने फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पर्वती भागातील जनता वसाहतीत राहायला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पतीच्या निधनानंतर महिला १२ आणि नऊ वर्षांच्या मुलींसह प्रियकरासोबत राहत होती. मुली प्रियकराला पप्पा असे म्हणत होत्या. दोन वर्षांपूर्वी आई आणि प्रियकराचे भांडण झाले. आई घरातून निघून गेली. तेव्हा आरोपीने १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले. मुलीला एका सामाजिक संस्थेत पाठविण्यात आले. सामाजिक संस्थेत तिची चौकशी, तसेच समुपदेशन करण्यात आले. तेव्हा आईच्या प्रियकराने अत्याचार केल्याची माहिती मुलीने दिली. प्रियकराने नऊ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे.

या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात प्रियकराविरुद्ध बाल लैगिंक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक काळे तपास करत आहेत.