October 1, 2023

पुणेकर न्यूज

पुणेकर न्यूज

पुणे: ‘फाॅरेक्स ट्रेडिंग’ मध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेला दोन कोटींचा गंडा घालून पसार झालेला आरोपी अटकेत

पुणे, ३०/०३/२०२३: परदेशी चलन खरेदी-विक्री व्यवहारात (फाॅरेक्स ट्रेडिंग) गुंतवणुकीवर परतावा देण्याच्या आमिषाने महिलेला दोन कोटी रुपयांची गंडा घालून पसार झालेल्या आरोपीस पोलिसांनी अटक केली.

विक्रांत रमेश पाटील (वय २५, रा. मोराळे, पलूस, जि. सांगली) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी त्याचा साथीदार आणि मावसभाऊ संतोषकुमार विष्णू गायकवाड (रा. बलवडी, ता. खानापूर, जि. सांगली) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

आरोपी विक्रांत पाटील आणि संतोषकुमार गायकवाड यांनी प्रभात रस्त्यावर बेस्ट पाॅईंट इम्पॅक्ट ट्रेडिंग कंपनीचे कार्यालय सुरु केले होते. आरोपींनी महिलेला परदेशी चलन खरेदी- विक्री व्यवहारात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखविले होते. गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे त्यांनी सांगितले होते. महिलेचा पती व्यावसायिक आहे. आरोपींनी दोन कोटी रुपये गुंतविल्यास ५० लाख रुपये नफा मिळेल, असे आमिष दाखविले होते. महिलेकडून दोन कोटी रुपये घेऊन आरोपी प्रभात रस्त्यावरील कार्यालय बंद करुन पसार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली होती .

त्यानंतर आरोपी पाटीलचा साथीदार गायकवाड दुबईला पसार झाला. पाटीलने गायकवाड याच्या बँक खात्यात काही रक्कम जमा केल्याची माहिती पोलिसांना तपासात मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाकडून पाटीलचा शोध घेण्यात येत होता. पाटील वानवडी परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले. अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुधीर इंगळे, राहुल सकट, राहुल होळकर यांनी ही कारवाई केली.

आरोपींकडून आणखी काही जणांची फसवणूक

या प्रकरणातील मुख्य आराेपी गायकवाड याच्या खात्यात पाटील याने पैसे पाठविले आहे. गायकवाड दुबईत पसार झाला आहे. आरोपींनी आणखी काही जणांची फसवणूक केल्याची शक्यता असून त्यांच्या विरुद्ध डेक्कन पोलीस ठाण्यात फसवणूक, ठेवीदारांचे हितसंरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक आयुक्त नारायण शिरगावकर तपास करत आहेत.