December 14, 2024

पुणे: विमानाने पुण्यात येउन मोबाइल चोरणार्‍या टोळीला अटक, दोन गुन्ह्यात ३० लाखांचे ४४ मोबाइल जप्त

पुणे, दि. २७/०२/२०२३: विमानाने पुण्यात येउन मोबाइल चोरणार्‍या टोळीला विमानतळ पोलिसांनी अटक केले आहे. त्यांच्याकडून  २८  लाखांचे ३९  मोबाइल जप्त केले आहेत. संबंधित टोळीकडून मोठमोठ्या आयोजित कार्यक्रमात जाउन मोबाइल चोरुन नेले जात होते. तर दुसर्‍या गुन्ह्यात अशाच कार्यक्रमातून मोबाइल चोरणार्‍याला अटक करीत त्याच्याकडून १ लाख ८७ हजारांचे पाच मोबाइल जप्त केले.

असद गुलजार महंमद (वय ३२ रा. सोनारवाली रोड दिल्ली)  निजाम बाबु कुरेशी (वय ३५ रा.जवाहर पार्क गाझीयाबाद उत्तर प्रदेश), शाहबाज भोले खान (वय २६ रा. दिल्ली )  राहुल लीलीधर कंगाले (वय ३०  रा  भोपरा साहीबाबाद गाझीयाबाद उत्तरप्रदेश)  नदीम इब्राहिम मलीक (४०  रा यमुनानगर शेजारी दिल्ली ) प्रशांत के. कुमार (रा. भोवी कॉलनी ता. भद्रावती शिमोगा कर्नाटक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत

विमानतळ परिसरातील महालक्ष्मी लॉन्समध्ये आयोजित   व्हिएचवन सुपरसॉनिक कॉन्सर्ट कार्यक्रमामध्ये मोबाईल चोरीच्या अनुषंगाने तक्रारी प्राप्त होत होत्या. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तपास करीत होते. तपास अधिकारी रविंद्र ढावरे पेट्रोलिंग करीत असताना  अविनाश शेवाळे यांना  संशयित दिसून आला. त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला असता तो पळुन जावु लागला. त्यावेळी अमलदार योगेश थोपटे आणि दादासाहेब बर्डे यांनी त्याचा पाठलाग करुन असदला ताब्यात घेतले. चौकशीत  त्याने  कॉन्सर्टमध्ये मोबाईल चोरी करण्यासाठी दिल्लीतून आल्याचे सांगितले.

टोळीतील साथीदार पुणे स्टेशन परिसरातील हॉटेलमध्ये थांबल्याचे त्याने सांगिलते. त्यानुसार पथकाने हॉटेलमधून चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २८ लाख ४० हजारांचे ३९ मोबाइल जप्त करण्यात आले.   त्याशिवाय दुसर्‍या गुन्ह्यात अशाच पद्धतीने मोबाइल चोरणार्‍याला पथकाने कर्नाटकमधून अटक केली. त्याच्याकडून १ लाख ८७ हजारांचे ५ मोबाइल जप्त केले आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार,  सहआयुक्त संदिप कर्णिक,  अपर आयुक्त  रंजन कुमार शर्मा, उपायुक्त शशिकांत बोराटे,  एसीपी किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे, पोलीस निरीक्षक संगीता माळी, उपनिरीक्षक रविंद्र ढावरे, समु चौधरी, अविनाश शेवाळे, सचिन कदम, सचिन जाधव, रुपेश पिसाळ, अंकुश जोगदंडे, नाना कर्चे, योगेश थोपटे, दादासाहेब बर्डे, ज्ञानदेव आवारी, शिवराज चव्हाण  यांनी केली.