पुणे, ३० डिसेंबर २०२५: राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात विधानसभा निवडणुकीच्या काळात पक्षांतर्गत आव्हान निर्माण करणारे भाजपाचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांची महापालिका निवडणुकीसाठीची उमेदवारी अखेरच्या क्षणी कापण्यात आली. त्यांच्या जागी कोथरूड उत्तर मंडल अध्यक्ष लहू बालवडकर यांना उमेदवारी देण्यात आल्याने भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा उफाळून आला आहे.
विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांना पक्षांतर्गत एकही विरोधक नको असताना, अमोल बालवडकर यांनी स्वतंत्र ताकद उभी करत आक्रमक प्रचार यंत्रणा राबवली होती. त्यामुळे पाटील यांच्याशी निर्माण झालेला तणाव उघड झाला होता. त्या रागातूनच बालवडकर यांना पक्षातून बेदखल करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपानंतर ते पुन्हा भाजपमध्ये सक्रिय झाले, मात्र त्यांची ही ‘चूक’ महापालिका निवडणुकीत काढण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
अर्ज भरण्यासाठी अवघा एक तास शिल्लक असताना अमोल बालवडकर यांची उमेदवारी नाकारण्यात आली. या धक्क्यानंतर गडबडीत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला आणि तात्काळ उमेदवारीही मिळवली.
प्रभाग क्रमांक ९ (सुस–बाणेर–पाषाण) मध्ये भाजपकडून तिकीट गुलदस्त्यात ठेवले गेल्याने शेवटपर्यंत संभ्रमाचे वातावरण होते. अखेर भाजपने प्रभाग क्रमांक ८ व ९ मध्ये सर्व माजी नगरसेवकांना डावलत नवे चेहरे पुढे केले. या निर्णयामुळे भाजपमधील नाराजी उघडपणे समोर आली असून, अमोल बालवडकर यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने पुण्यातील राजकारणाला नवे वळण मिळाले आहे.

More Stories
प्रभाग क्रमांक २०मध्ये भाजपा उमेदवारांची प्रचारात आघाडी
Pune: २४ तास प्रभागातील नागरिकांच्या सेवेत उपलब्ध राहणार: राघवेंद्र बाप्पु मानकर
प्रभाग क्रमांक २० मध्ये भाजप उमेदवारांचा जोरदार प्रचार