April 16, 2024

पुणे: कात्रज घाटात दुचाकी घसरली, अल्पवयीन मुलांकडून दोन पिस्तुलांसह काडतुसे जप्त

पुणे, ०१/५/२०२३: कात्रज घाटात दुचाकी घसरून युवकासह दाेन अल्पवयीन मुले गंभीर जखमी झाली. अपघातात गंभीर जखमी झालेली अल्पवयीन मुले गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती तपासात उघडकीस आली असून त्यांच्याकडून दोन पिस्तुले आणि दोन काडतुसे भारती विद्यापीठ पोलिसांनी जप्त केली.

या प्रकरणी संतोष राजू पासवान (वय २१, रा. बेनकर वस्ती, धायरी) याच्यासह दोन अल्पवयीन मुलांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातात पासवान आणि त्याच्याबरोबर असलेली दोन अल्पवयीन मुले जखमी झाली असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या बरोबर असलेला एक साथीदार पसार झाला आहे. याबाबत पोलीस शिपाई गणेश काळे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संताेष पासवान याच्यासह चौघे जण एकाच दुचाकीवरून जुन्या कात्रज घाटातून निघाले होते. कात्रज बोगद्यापासून काही अंतरावर दुचाकीस्वार अल्पवयीन मुलाचे नियंत्रण सुटले. दुचाकी घसरल्याने पासवान याच्यासह दोन अल्पवयीन मुले जखमी झाली. त्यांच्याबरोबर असलेला साथीदार तेथून पसार झाला.

अपघाताची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पासवान याच्यासह दोन अल्पवयीन मुलांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. अल्पवयीन मुलांकडे देशी बनावटीची दोन पिस्तुले आणि दोन काडतुसे सापडल्याने पोलीस चक्रावून गेली. पासवान आणि त्याच्याबरोबर असलेली अल्पवयीन मुले गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यांच्याकडून पिस्तुले आणि काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.