पुणे, ०६/०६/२०२३: नगर रस्त्यावरील वाघोलीतील तलाठी कार्यालयात कामे घेऊन येणाऱ्या नागरिकांकडून लाच मागणाऱ्या दोन दलालांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. दलालांनी तलाठ्यांना पैसे द्यावे लागतात, असे सांगून ५० हजार रुपयांची लाच मागितली होती.
या प्रकरणी भाऊसाहेब भिकाजी गिरी (वय ५६, रा. साई बालाजी सोसायटी, आव्हाळवाडी, वाघोली, नगर रस्ता), संजय मारुती लगड (वय ५३, रा. लोहगाव) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदाराने पत्नीच्या नावे वाघोली परिसरात जमीन खरेदी केली होती. खरेदी केलेल्या जमिनीची नोंद सातबारा उताऱ्यावर करण्यासाठी तलाठी कार्यालयात वावरणारे दलाल भाऊसाहेब गिरी आणि संजय लगड यांनी तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. तलाठी पटांगे यांना ४५ हजार रुपये द्यावे लागतील, असे तक्रारदाराला सांगितले होते.
त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. सापळा लावून गिरी, लगड यांना पकडले. त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त अधीक्षक डाॅ. शीतल जानवे-खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक श्रीहरी पाटील आणि पथकाने ही कारवाई केली. पोलीस उपअधीक्षक माधुरी भोसले तपास करत आहेत.

More Stories
मतदान करा, हेच खरे आवाहन ; अभिनेते प्रवीण तरडे यांचे मतदात्यांना आवाहन
अभिनेता सुबोध भावे यांनी पुणेकरांसोबत मतदानाचा हक्क बजावला
शाई पुसून मतदानाचा गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणार नाही