March 3, 2026

Pune: जेएम रोड, एफसी रोडवर बुलडोझर

पुणे, ता. १४ फेब्रुवारी २०२६ : शहराच्या मध्यवर्ती भागात बेकायदा अतिक्रमणांनी अक्षरशः रस्ते आणि पदपथ गिळंकृत केले असताना अखेर महापालिकेने आज सकाळी धडक कारवाई करत अतिक्रमणांवर बुलडोझर फिरवला. बालगंधर्व चौक ते डेक्कन कॉर्नर आणि ज्ञानेश्वर पादुका चौक या संपूर्ण पट्ट्यात अतिक्रमण निर्मूलन विभागाने मोठ्या फौजफाट्यासह कारवाई केली.

शिवाजीनगर-घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत झालेल्या या कारवाईत उपायुक्त सोमनाथ बनकर स्वतः उपस्थित होते. तब्बल १५ क्षेत्रीय कार्यालयांतील अतिक्रमण पथके, जेसीबी, गॅस कटर, ओपन ट्रक, बिगारी सेवक आणि महाराष्ट्र पोलीस सुरक्षा बल यांच्या बंदोबस्तात ही मोहीम राबवण्यात आली.

रस्ता-पदपथ मोकळे; पाच ट्रक साहित्य जप्त

फ्रंट मार्जिन आणि साईड मार्जिनमध्ये अनधिकृतरीत्या उभारलेली कच्ची-पक्की शेड, टपऱ्या, लोखंडी जाळ्या, हातगाड्या, खुर्च्या-टेबल, फ्रिज, होजिअरी साहित्य अशा सर्व अतिक्रमणांवर सपासप कारवाई करण्यात आली. पदपथावर पसरलेले पथारी व्यवसाय हटवण्यात आले.

या कारवाईत सुमारे पाच ट्रकभर साहित्य जप्त करण्यात आले. अनेक ठिकाणी व्यावसायिकांनी पदपथ पूर्णपणे व्यापल्याने पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागत होते. आजच्या कारवाईनंतर हा भाग पूर्णपणे मोकळा करण्यात आला.

जंगली महाराज रस्ता आणि डेक्कन भागात धडक

जंगली महाराज रस्ता, गोपाळकृष्ण गोखले रस्ता आणि डेक्कन परिसरातही सकाळपासूनच कारवाईचा जोर कायम होता. अनेक वर्षांपासून वाढत गेलेल्या अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडी, अपघाताचा धोका आणि नागरिकांचा त्रास वाढला होता. या पार्श्वभूमीवर महापालिकेची ही कारवाई विशेष महत्त्वाची मानली जात आहे.

‘पुन्हा अतिक्रमण केल्यास कडक कारवाई’

कारवाईनंतर नागरिकांनी समाधान व्यक्त केले. व्यापाऱ्यांना वारंवार सूचना देऊनही अतिक्रमण सुरूच असल्याने अखेर कठोर पाऊल उचलण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

उपायुक्त सोमनाथ बनकर म्हणाले
“रस्ता आणि पदपथ हा सर्वसामान्य नागरिकांचा हक्काचा आहे. कोणालाही तो बेकायदा ताब्यात घेऊ देणार नाही. आजची कारवाई ही केवळ सुरुवात आहे. पुन्हा अतिक्रमण केल्यास अधिक कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई करण्यात येईल.”