July 27, 2024

पुणे: निवृत्ती एसीपीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

पुणे, २०/०५/२०२३: लोहगाव येथील एका बांधकाम प्रकल्पाची माहिती घेण्यासाठी गेलेल्या 44 वर्षीय महिलेचा मोबाईल हिसकावून घेऊन, तिच्या सोबत गैरवर्तन केल्या प्रकरणी महाराष्ट्र मेगासिटी पोलीस गृहरचना संस्थेचे संचालक, सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त सुरेश भामरे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती विमानतळ पोलिसांनी शनिवारी दिली आहे.

सदरचा प्रकार लोहगाव येथील महाराष्ट्र मेगासिटी पोलीस गृहरचना संस्थेच्या ठिकाणी 18 मे रोजी घडला आहे. याबाबत येरवडातील शास्त्रीनगर येथील एका ४४ वर्षाच्या महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त सुरेश भामरे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहगाव येथील महाराष्ट्र मेगासिटी पोलीस गृहरचना संस्थेचा प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. त्याबाबत संचालक मंडळावर गुंतवणूकदार यांच्याकडून आरोप प्रत्यारोप होत आहेत.
तक्रारदार या बांधकाम प्रकल्पाची माहिती घेण्यासाठी सदरजागी गेल्या होत्या. त्यावेळी त्या बांधकामाचे शुटिंग करीत होत्या.

तेव्हा भामरे यांनी त्यांचा मोबाईल बळजबरीने हिसकावून घेतला. तसेच महिलेचा हात पकडून त्यांचा गालाला स्पर्श करुन मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले आहे. याबाबत जाब विचारला असता, तिला अश्लिल शिवीगाळ केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विमानतळ पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक (गुन्हे) संगिता माळी याबाबत पुढील तपास करीत आहेत.