June 14, 2024

पुणे: बकरी ईदनिमित्त गोळीबार मैदान चौकातील वाहतूक व्यवस्थेत बदल

पुणे, २८/०६/२०२३: बकरी ईदनिमित्त लष्कर भागातील गोळीबार मैदान येतील ईदगाह मैदान येथे सामूहिक नमाज पठणाचा कार्यक्रम गुरुवारी (२९ जून) आयोजित करण्यात आला आहे. गोळीबार मैदान चोकातील वाहतूक व्यवस्थेत गुरुवारी सकाळी सहा वाजेपासून नमाज पठणाची सांगता होईपर्यंत बदल करण्यात आले आहेत.

वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे. गुरुवारी सकाळी सहा वाजल्यानंतर लष्कर भागातील मम्मादेवी चौक ते गोळीबार मैदान चौक ते ढोले पाटील चौक (सेव्हन लव्हज) दरम्यान सर्व प्रकारची वाहतूक आवश्यकतेनुसार बंद करण्यात येणार आहे.

वाहतूक बदल पुढीलप्रमाणे-गोळीबार मैदान चाैकातून स्वारगेटकडे जाणारा मार्ग नमाज पठणाच्या वेळी बंद करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी गोळीबार चौकातून डाव्या बाजूला वळून सीडीओ चौक येथून उजवीकडे वळून गिरीधर भवन चौकमार्गे उजवीकडे वळावे. ढोली पाटील चौकातून इच्छितस्थळी जावे. सीडीओ चौक ते गोळीबार मैदान चाैकाकडे येणारी वाहतूक सकाळी सहा ते अकरा या वेळेत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. लुल्लानगरकडून लष्कर भागातील खाण्या मारुती चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी खटाव बंगला चौक, नेपीयर रोड, मम्मादेवी चौक, बिशप स्कूलमार्गे वानवडी बाजार चौकाकडे जावे. गिरीधर भवन चौकातून लष्कर भागाकडे येणाऱ्या वाहनांनी ढोले पाटील चौकातून नेहरु रस्त्याने इच्छितस्थळी जावे.

ढोले पाटील चौक ते गोळीबार मैदान चौक दरम्यानची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी सॅलसबरी पार्क, सीडीओ चौक, भैराबानाला चौकातून इच्छितस्थळी जावे. सोलापूर रस्त्याने मम्मादेवी चाैकातून गोळीबार मैदानाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. भैरोबानाला ते गोळीबार मैदानाकडे जाणारी वाहतूक भैरोबानाला येथून एम्प्रेस गार्डन आणि लुल्लानगरकडे वळविण्यात येणार आहे. कोंढवा भागातून गोळीबार मैदानाकडे जाण्यास जड वाहनांना मनाई करण्यात आली आहे. ट्रक, एसटी बस, पीएमपी बसने लुल्लानगर चौकातून भैरोबानाला किंवा गंगाधाम चौकातून इच्छितस्थळी जावे.