June 14, 2024

पुणे: मित्र, मैत्रिणीच्या त्रासामुळे महाविद्यालयीन युवतीची आत्महत्या

पुणे, २०/०२/२०२३: मैत्रिणीने अमली पदार्थांचे सेवन करण्यास भाग पाडले. मित्राने संशय घेऊन मारहाण केल्याने एका महाविद्यालयीन युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. युवतीने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून आत्महत्येमागचे कारण समोर आले असून विमानतळ पोलिसांनी मैत्रीण तसेच मित्राच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हरलीन कौर (वय २१, रा. विमाननगर) र्असे आत्महत्या केलेल्या महाविद्यालयीन युवतीचे नाव आहे. या प्रकरणी हरलीनचा मित्र साईराज आणि मैत्रीण उत्कर्षा ससाणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत हरलीनच्या आईने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हरलीन हाॅटेल व्यवस्थापन महाविद्यालयात शिक्षण घेत होती. तिने १ फेब्रुवारी राेजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर कौर कुटुंबीय धार्मिक विधीसाठी अमृतसरला गेले होते. अमृतसरहून कौर कुटुंबीय पुण्यात परतले.

आईने हरलीनची वही, पुस्तक उघडून पाहिले. तेव्हा हरलीनने वहीत आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली. मैत्रिणीने सिगारेट आणि गांजा ओढण्याची सवय लावली. मित्र साईराज दुसऱ्या मुलाशी प्रेमसंबंध असल्याच्या संशायवरुन मारहाण करायचा. त्याने हरलीनचा मोबाइल संच घेतला. मैत्रिणीने तिला धमकावले होते, असे हरलीनने चिठ्ठीत म्हटले होते. हरलीनच्या आईने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक पाठक तपास करत आहेत.