January 11, 2026

Pune: पुणे फस्ट चा काँग्रेसचा नारा – जाहीरनाम्यात केल्या तरतुदी

पुणे, ८जानेवारी २०२६ ः खड्डेमुक्त रस्ते, वाहतूक कोंडीपासून सुटका, समान पाणीपुरवठा, पीएमपीचे सक्षमीकरण, महापालिकेच्या शाळा आणि पायाभूत सुविधांचे सबलीकरण, प्रदूषणापासून मुक्तता करण्याबरोबरच पुणे शहराला पर्यटनाची राजधानी करण्याचे आश्वासन गुरुवारी काँग्रेसने पुणेकरांना ‘अधिकारनामा’च्या माध्यमातून दिले आहे.

ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री व पुण्याचे प्रभारी आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत महापालिका निवडणुकीसाठी ‘पुणे फस्ट’ या नावाने आधारनामा जाहीर करण्यात आला. शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी मंत्री रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, दिप्ती चौधरी, ॲड. अभय छाजेड, प्रशांत जगताप, अजित दरेकर आणि शहर युवक अध्यक्ष सौरभ अमराळे उपस्थित होते.

या आधारनाम्‍याच्या माध्यमातून महापालिकेत सत्तेत असताना पक्षाने केलेली कामांवर जोर दिला आहे. तर सत्तेत आल्यावर कोणत्या कामांना प्रधान्य देणार हे नमूद करण्यात आले आहे. पाटील म्हणाले, ‘‘सत्तेत असलेली लोक पाण्याबाबत बोलत नाहीत. पुरेशा पाण्यासाठी नागरिकांना एनजीटीमध्ये जावे लागले. भाजपने पुण्याबाबत केवळ घोषणा केल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात ते प्रकल्प पूर्ण झाले नाहीत. ‘पुणे फर्स्ट’ हेच आमचे प्रमुख ध्येय राहणार आहे.’’ पुणेकरांनी आम्हांला पाच वर्षांची संधी द्यावी, दिलेले शब्द आम्ही पाळू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

काँग्रेस ९८ तर शिवसेना ७६ जगांवर ः
कोण किती जागा लढविणार याबाबत आमच्यात कोणतेच मतभेद नाही. आघाडी म्हणून निवडणूक लढवीत असताना आम्ही एकमेकांच्या समोर येणार नाही, याचे नियोजन आम्ही केले आहे. ९८ जागी काँग्रेस तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ७६ जांगांवर निवडणूक लढवत आहे. आठ ते नऊ जागांवर दोन्ही पक्षांचे उमेदवार आहेत. त्याबाबत आज आम्ही निर्णय घेऊ, अशी माहिती अरविंद शिंदे यांनी दिली.

काँग्रेसने सत्तेत असताना केलेली कामे ः
– जेएनएनयूआरएमच्या माध्यमातून पायाभूत सुविधांची कामे करण्यात आली
– मेट्रोची पायाभरणी
– बीआरटी मार्गांसाठी एक हजार कोटींपेक्षा जास्त निधी
– राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी शहराच्या सर्व बाजूंनी रस्त्यांची निर्मिती केली
– तीन टप्प्यांत पाणीपुरवठा योजना आणली
– मलनिस्सारण योजना पूर्ण केली
– शहरात १०० पेक्षा जास्त उद्यानांची निर्मिती
– झोपडपट्ट्यांमध्ये सुलभ शौचालयांची योजना राबविली
– आयटी कंपन्यांना मिळकत करात सुट दिली

सत्तेत आल्यास ही कामे करणार ः
– समान पाणीपुरवठा करणार
– शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविणार
– महिलांना पीएमपीचा विनामूल्य प्रवास
– ६७८ मिसिंग लिंक रोडची कामे पूर्ण करणार
– ३२ महत्त्वाच्या रस्त्यांची स्थिती सुधारणा करून अतिक्रमणे काढणार
– पीएमपीच्या ताफ्यात पाच हजार ईव्ही बस वाढ करणार
– वॉर्डस्तरीय कचरा व्यवस्थापन करणार
– कोयता गँगसह गुन्हेगारांचा बंदोबस्त करू
– मालमत्ता करावरील व्याज एक टक्क्यांवर आणणार
– ५०० चौरस फुटापर्यंतची घरे करमुक्त करणार