March 3, 2026

Pune: विमानतळापर्यंत थेट मेट्रोची कनेक्टिव्हिटी – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती

पुणे, 03/03/2026: ‘लोहगाव येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रोने जोडला जाणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रयत्न केले जात होते. सहा विविध मार्गांवर चर्चा होऊन त्यातील व्यावहारिक मार्ग अंतिम करण्यात आला आहे. त्यामुळे आता विमानतळ थेट मेट्रो मार्गाने जोडला जाईल, अशी माहिती पुण्याचे खासदार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

तसेच खडकवासला ते हिंजवडी या मेट्रो मार्गासाठी विस्तृत प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या असल्याचेही मोहोळ यांनी नमूद केले.

शहर आणि परिसरातील विविध विकासकामे आणि प्रकल्पांसंदर्भात मोहोळ यांनी सोमवारी प्रशासनाच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत सविस्तर बैठक घेऊन आढावा घेतला. विकासप्रकल्प कालबद्ध वेळेत आणि दर्जेदारपणे पूर्ण करावेत, अशा सूचनाही केल्या. या बैठकीत पुणे शहराच्या भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या  १६ विकासप्रकल्प आणि कामांसंदर्भात चर्चा करण्यात आली. त्याबाबत मोहोळ यांनी माध्यमांना ही माहिती दिली.

वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या मेट्रो मार्गांचे काम लवकरच सुरू होणार आहे.‘पीएमआरडीए’च्या माध्यमातून साकारलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे काम ९४ टक्के पूर्ण झाले आहे. या मार्गावरील २३ पैकी १३ स्टेशनचे काम एप्रिलअखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या येरवडा कारागृह ते विमानतळ आणि कल्याणीनगर ते विमानतळ या रस्त्यांच्या विस्तारीकरण व सौंदर्यीकरणाला लवकरच सुरुवात होईल. त्यासाठी आवश्यकतेनुसार भूसंपादनही सुरू केले जाईल. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीचे विस्तारीकरणासाठी विमानतळाभोवती पर्यायी रस्ता तयार करण्यासंदर्भातही बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याचे मोहोळ यांनी नमूद  केले.

राष्ट्रीय नदीसंवर्धन प्रकल्पांतर्गत नदीसुधार आणि नदी पुनरुज्जीवन प्रकल्पच्या कामाचाही आढावा घेत काम वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना मोहोळ यांनी दिल्या. तसेच समान पाणीपुरवठा योजनेच्या अंतिम टप्यात उर्वरित साठवणूक टाक्यांचे व जलवाहिन्यांचे तसेच मीटर बसवण्याचे काम त्वरीत पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

गेल्या काही दिवसांत शहरातील प्रदूषणात वाढ झाली आहे. याबाबत योग्य त्या उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात तसेच शहरातील पदपथ अतिक्रमण मुक्त केले जावेत, याबाबतही मोहोळ यांनी प्रशासनाला सूचना दिल्या.

मोहोळ हे स्थायी समितीचे अध्यक्ष असताना त्यांच्या संकल्पनेतून आणि पुणे महापालिकेच्या माध्यमातून साकारलेल्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाची नवीन इमारत आणि वसतिगृह इमारतीच्या सद्यस्थितीचा आढावा घेत हे कामही निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात यावे, असे निर्देश मोहोळ यांनी दिले.

शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या या बैठकीला महापौर मंजूषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे,  स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे, महामेट्रोचे कार्यकारी संचालक श्रावण हर्डीकर, लोहगाव विमानतळाचे संचालक  संतोष ढोके, हवाई दलाचे अधिकारी तसेच विविध शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

स्मारकांच्या कामांचाही आढावा

एनडीए (चांदणी) चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य स्मारक, डेक्कन जिमखाना येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक, बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास, कोथरूड येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कलामंदिर, गदिमा स्मारक, लहुजी वस्ताद साळवे स्मारक आदी कामांचा आढावा घेत ही सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही मोहोळ यांनी प्रशासनाला दिल्या.