October 16, 2025

पुणे: ई-हक्क प्रणालीचा वापर करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांचे आवाहन

पुणे, दि.१०/०१/२०२५: ई-फेरफार प्रणालीला पूरक असलेल्या ई-हक्क प्रणालीचा (पब्लिक डाटा एन्ट्री) वापर करुन वारस नोंद, सात-बारावरील इकरार नोंदी, मयतांचे नाव कमी करणे, अपाक कमी करणे आदी विविध कामे करता येणार असल्याने नागरिकांनी या प्रणालीचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी (दि. 8) आयोजित जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, ई-हक्क प्रणालीमधून केलेले सर्व अर्ज तलाठी यांना ई-फेरफार मध्ये घेऊन (फेच करुन) फेरफार मध्ये रुपांतरीत करता येणार आहेत. ई-हक्क प्रणालीचा वापर करण्यासाठी प्रणालीच्या https://pdeigr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नागरिक, सहकारी संस्था यांना वापरकर्ता नोंदणी करावी लागेल. नोंदणीनंतर लॉगिन करुन अर्जदारांना वारस नोंद, बोजा दाखल करणे, बोजा कमी करणे, इकरार नोंदी, मयताचे नांवे कमी करणे, अपाक कमी करणे, एकुमॅ. कमी करणे, विश्वस्तांचे नाव कमी करणे, कलम १५५ बाबतचे अर्ज सादर करता येणार आहेत.

या प्रणालीवर नागरीक, सहकारी संस्था ऑनलाईन प्रणालीद्वारे घरबसल्या आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करुन ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडे यांचेकडे पाठवू शकतात. त्यासाठी ग्राम महसूल अधिकाऱ्याच्या कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. यामध्ये नागरिक स्वतः अथवा महा ई-सेवा केंद्रातून देखील अर्ज करु शकतात. या प्रणालीच्या वापराने ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडील फेरफार घेण्याचे कामकाज सुलभ होणार असून महसूल प्रशासनाच्या कामकाजामध्ये गतिमानता व पारदर्शकता येण्यास मदत होणार आहे.

जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी यापुढे वरील नोंदींचे अर्ज ई-हक्क प्रणाली मधूनच करावेत. सदर सुविधेचा जास्तीत जास्त वापर नागरिकांनी करणेबाबत आवाहन डूडी यांनी यावेळी केले.

You may have missed