March 3, 2026

पुणे जिल्हा फुटबॉल संघटना सुपर डिव्हीजन श्रेणी फुटबॉल २०२६ स्पर्धेस १ मार्चपासून सुरुवात

पुणे, २७ फेब्रुवारी २०२६: पुणे जिल्हा फुटबॉल संघटना यांच्या वतीने प्रतिष्ठित अशा सुपर डिव्हीजन श्रेणी फुटबॉल २०२६ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये शहरांतील नामांकित १७ संघांनी आपला सहभाग नोंदवला आहे. हि स्पर्धा बावधन येथील हॉटफूट फुटबॉल मैदानावर १ मार्च ते १ जून २०२६ या कालावधीत दर आठवड्याच्या शेवटी शनिवार व रविवार या दिवशी रंगणार आहे.

या लीगच्या आगामी मोसमाच्या भरघोस यशाबद्दल आत्मविश्वास व्यक्त करताना पीडीएफएचे मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षय प्यारेलाल चौधरी म्हणाले की, सुपर डिव्हिजन लीग २०२६ स्पर्धेचे यजमानपद भूषवताना आम्हांला अत्यंत आनंद होत असून आमचे मुख्य प्रायोजक फोर्झा फुटबॉल यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. हि सुपर डिव्हिजन स्पर्धा पीडीएफ अंतर्गत होणारी सर्वात प्रतिष्ठेची लीग असून पुणे परिसरातील फुटबॉल खेळाच्या विकासासाठी या लीगची मोठी ,मदत होणार आहे. यंदाच्या १७ नामांकित संघ सहभागी होत असून त्यात उच्च दर्जाच्या फुटबॉलचे आणि एकापेक्षा एक चुरशीच्या लढती पाहायला मिळतील अशी आमची खात्री आहे.

स्पर्धेत आयफा अ, चेतक एफसी अ, सीएमएस फाल्कन्स अ, डेक्कन इलेव्हन एफसी अ, दिएगो ज्युनियर एफसी अ, फातिमा इलेव्हन एसए, जीओजी एफसी अ, इंद्रायणी स्पोर्ट्स क्लब, न्यु इंडिया सॉकर क्लब, परशुरामीयन्स सॉकर क्लब अ, फिनिक्स स्पोर्ट्स अकादमी, रेंजहिल्स यंग बॉईज एफसी, रियल पुणे युनायटेड एफसी अ, संगम स्पोर्ट्स क्लब अ, सिग्मय पुणे एफसी अ, थंडरकॅटज एफसी अ, युकेएम कोथरूड एफसी अ हे १७ संघ आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. तसेच, हि स्पर्धा साखळी पद्धतीने खेळविण्यात येणार असून गुणतक्त्यातील अव्वल संघ विजेता ठरणार आहे.

स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघाला करंडक व रोख रकमेची पारितोषिके देण्यात येणार आहेत. याशिवाय सर्वोत्कृष्ट गोलरक्षक, सर्वोत्कृष्ट मध्यरक्षक, मालिकावीर यांना देखील आकर्षक अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.