पुणे, २७/०३/२०२३: भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने एका बांधकाम व्यावासायिकाकडे तीन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी कोथरुड पोलिसांकडून दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी संदीप पिरगोंडा पाटील, शेखर गजानन ताकवणे (वय ३५, रा. भालेकर चाळ, कर्वे रस्ता) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका बांधकाम व्यावसायिकाने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी आरोपी पाटील,ताकवणे यांच्या विरुद्ध खंडणी, धमकावणे, माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पौड रस्त्यावर बांधकाम व्यावसायिकाचे कार्यालय आहे. दोन दिवसांपूर्वी आरोपी पाटील, ताकवणे यांनी बांधकाम व्यावसायिकाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, त्यांच्या मावसभावाचा नावाचा वापर करुन त्यांनी बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागितली. भारतीय जनता पक्षाच्या युवा माेर्चाकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी तीन कोटी रुपये हवे आहेत. पैसे न दिल्यास भविष्यात बांधकाम व्यवसायाला हानी पोहचवू, अशी धमकी आरोपी पाटील आणि ताकवणे यांनी दिली.
आरोपींनी बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागण्यासाठी मोबाइल तंत्रज्ञानाचा वापर केला. बांधकाम व्यावसायिकाच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बडे तपास करत आहेत.

More Stories
मतदान करा, हेच खरे आवाहन ; अभिनेते प्रवीण तरडे यांचे मतदात्यांना आवाहन
अभिनेता सुबोध भावे यांनी पुणेकरांसोबत मतदानाचा हक्क बजावला
शाई पुसून मतदानाचा गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणार नाही