पुणे, १३ जानेवारी २०२५: विकास आराखड्यात रस्ता दाखविल्यानंतर ती जागा प्रत्यक्षात ताब्यात आल्यानंतर महापालिकेकडून रस्ता तयार करण्याचे काम सुरु केले जाते. मात्र, धायरीमध्ये एक अजब प्रकार समोर आला आहे. बांधकाम व्यावसायिकाने जागा हस्तांतरित केलेली नाही, त्यास टीडीआर देण्याची फाइल अद्याप मंजूर नाही. पण या इमारतीला खेटून तब्बल ४१ लाख रुपये खर्चून रस्ता तयार केला जात आहे. हा रस्ता नेमका कोणाच्या उपयोगाचा आहे असा प्रश्न पडला आहे.
धायरी व परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे. महापालिकेच्या विकास आराखड्यात धायरीसाठी मॉकडोनॉल्ड ते सावित्री गार्डन असा पर्यायी रस्ता दाखविण्यात आला आहे. याठिकाणी महापालिकेने आत्तापर्यंत सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्च केले आहेत. पण अजूनही या ठिकाणी जागेची मोजणी, रस्त्याची आखणी अंतिम होऊ शकलेली नाही. हा पर्यायी रस्ता लवकर करावा अशी मागणी असूनही महापालिका त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. पण धायरीकरांसाठी उपयुक्त नसलेल्या रस्त्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे.
धायरीतील गल्ली क्रमांक २१ अ मध्ये महापालिकेने रस्त्याचे काम सुरु केले आहे, हा विकास आराखड्यातील रस्ता आहे, पण रस्त्याचे काम करताना तेथे ठेकेदाराने माहिती फलक लावलेला नाही. ज्या ठिकाणी काम सुरु आहे, त्याचे भोवती पत्र्याचे कुंपण असून, ते न काढल्याने तेथे महापालिकेच्या रस्त्याचे काम सुरु आहे सुद्धा लक्षात येत नाही. ही जागा अजून महापालिकेला हस्तांतरित झालेली नसतानाही पथ विभागाने ४१ लाख रुपयांची निविदा काढून सुमारे २०० मिटर रस्त्याचे काम सुरु केले आहे. पण त्याचा उपयोग नागरिकांना होणारच नाही असे असताना हे रस्ता कोणासाठी केला असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर म्हणाले, ‘‘संबंधित जागा मालकाने टीडीआरसाठी फाइल टाकली असून, ती जागा ताब्यात मिळणार आहे. या रस्त्याच्या कामाची माहिती देणारा फलक लावला जाईल, तसेच पत्रेही काढून टाकले जातील. हा रस्ता नागरिकांच्या वापरासाठी असणार आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख महेश पोकळे म्हणाले, ‘‘महापालिकेने नागरिकांच्या हिताची कामे करावी यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत, पण ज्या रस्त्याचा वापर नागरिकांसाठी होणार नाही त्याचेच काम प्राधान्याने केले आहे. हा रस्ता कोणाच्या हिताचा आहे?

More Stories
पुणे ग्रँड टूरनिमित्त १९ जानेवारीला पुण्यातील प्रमुख रस्त्यावरील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी
मतदान करा, हेच खरे आवाहन ; अभिनेते प्रवीण तरडे यांचे मतदात्यांना आवाहन
अभिनेता सुबोध भावे यांनी पुणेकरांसोबत मतदानाचा हक्क बजावला