पुणे, १५/०३/२०२३: पुण्यात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या पाकिस्तानी युवकाला विशेष शाखेने (स्पेशल सेल) पकडले. युवकाकडून बनावट भारतीय पारपत्र जप्त करण्यात आले आहे. जन्माने पाकिस्तानी असलेल्या युवकाची आजी आणि मामा पुण्यात राहायला आहेत. कौटुंबिक वादातून त्याच्या आईने पाकिस्तानी पतीपासून फारकत घेतली आणि ती आखाती देशात राहायला गेली. आठ वर्षांपूर्वी अल्पवयीन असणाऱ्या मुलाला तिने पुण्यात आजीकडे शालेय शिक्षणासाठी पाठविले. मुलाने बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय पारपत्र मिळवले. कौटुंबिक वादातून पाकिस्तानात जन्मलेल्या युवकाची फरफट झाल्याची माहिती पोलिसांना तपासात मिळाली आहे.
महम्मद अमान अन्सारी (वय २२) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी अन्सारीच्या विरुद्ध खडक पोलिस ठाण्यात फसवणूक, बनावट शासकीय कागदपत्रे तयार करणे तसेच विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ कलम १४ आणि पारपत्र कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष शाखेतील परकीय नागरिक पडताळणी विभागातील पोलीस कर्मचारी केदार जाधव यांनी याबाबत खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अन्सारी पाकिस्तानी नागरिक असून तो शहरात बेकायदा वास्तव्य करत असल्याची माहिती विशेष शाखेला मिळाली होती. त्यानंतर त्याला भवानी पेठेतील चुडामण तालीम चौक परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्याची चौकशी करण्यात आली. तेव्हा त्याच्याकडे भारतीय पारपत्र आढळून आले. अन्सारीने बनावट कागपत्रांद्वारे भारतीय पारपत्र मिळवल्याचे उघड झाले. बेकायदा वास्तव्य केल्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली. त्याची चौकशी करण्यात येत आहे. खडक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश तटकरे तपास करत आहेत.
पाकिस्तानात महम्मद अन्सारी बनावट कागदपत्रांद्वारे भारतीय पारपत्र मिळवले. अटकेत असलेल्या अन्सारीची कसून चौकशी करण्यात येत आहे. अन्सारीची आई भारतीय आहे. तिने पाकिस्तानी नागरिक यांच्याशी विवाह केला होता. महम्मद अन्सारीचा जन्म पाकिस्तानात झाला होता. मात्र, कौटुंबिक वाद झाल्याने त्याची आई संयुक्त अरब अमिरातीत (यूएई) राहायला गेली. २०१५ मध्ये महम्मदच्या आईने त्याला पुण्यात राहणारा मामा आणि आजीकडे शिक्षणासाठी पाठविले. त्या वेळी तो अल्पवयीन होता. पुण्यात शिक्षण घेत असताना त्याने जन्म पाकिस्तानात झाल्याचे लपवून ठेवले. बनावट कागदपत्रांच्या आधारे त्याने पारपत्र मिळवले. पारपत्र मिळवल्यानंतर तो आईला भेटायला विमानाने दुबईत गेला होता.
More Stories
भाषिक कौशल्यातून रोजगाराच्या अनेक संधी: प्रो. पराग काळकर
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात हिंदी दिवस सोहळा आणि पुस्तक प्रकाशन कार्यक्रम संपन्न
केंद्र सरकारच्या सहकारी संस्थांबाबतच्या नवीन कायद्याची माहिती घेऊन विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी व्यवसाय उभे करावेत – सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील