October 14, 2025

पुणे: ‘त्या’ भाजप नेत्यांना गौरव बापट यांचा आहेर

पुणे, १३ जून २०२४ः शहर लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची विश्वासार्हयता, नरेंद्र मोदी यांचे नेतृत्त्व, उमेदवाराची लोकप्रियता आणि कार्यकर्त्यांचे काम यांच्या आधारावच मुरलीधर मोहोळ यांचा विजय झाला आहे. त्यामुळे त्यांच्या विजयाचे व्यक्तिगत श्रेय घेण्याचे टाळावे. वसंतराव भागवत, रामभाऊ म्हाळगी, गिरीश बापट यांचे हे संस्कार नाहीत, अशा शब्दांत बापट यांचे पुत्र गौरव बापट यांनी भाजपच्या काही नेत्यांना घरचा आहेर दिला आहे.

लोकसभा निवडणुकीत कॅंटोन्मेंट वगळता कसबा, कोथरूड, पर्वती, वडगाव शेरी आणि शिवाजीनगर या मतदारसंघातून भाजपला मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे काही नेते आणि व्यक्ती मताधिक्य आमच्यामुळेच मिळाले आहे, असे सांगत आहेत. त्यावर बापट यांनी बोट ठेवले आहे. त्या बाबतची नाराजी सोशल मीडियावर व्यक्त करताना ते म्हणाले आहे की, ‘लाखापेक्षा जास्त मताधिक्याने मोहोळ खासदार झाले. परंतु या विजयात कोणी एकच वाटेकरी नाही. माझ्यामुळेच कसे मताधिक्य मिळाले हे सांगण्याची जी अहमहमिका पुणे शहरातील काही भाजप नेते आणि काही व्यक्तिंमध्ये सुरू आहे ते बघून वाईट वाटते. या निवडणुकीत मोदी यांच्या नेतृत्त्वावरील विश्वासाबरोबरच पक्षाचे कार्यकर्ते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते, पतित पावन संघटनेचे कार्यकर्ते, शिवसैनिक, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनसैनिक, राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते, रिपाई आठवले गटाचे सर्व कार्यकर्ते, लोकजनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते, अनेक सामाजिक संघटना या सर्वांचा वाटा या विजयात आहे. पक्षाच्या राज्यातील नेत्यांनीही त्यासाठी मेहनत घेतली. त्यामुळे अमुक मतदारसंघात माझ्यामुळे मताधिक्य मिळाले हे सांगणे, त्याची सर्वत्र जाहिरात करणे, फ्लेक्स लावणे, हे हास्यास्पद आहे.’

बापट म्हणाले, ‘‘कार्यकर्ता हा पक्षाचा पाया आहे. स्वतःच्या नावाची टिमकी वाजवून आपण त्या कार्यकर्त्याला अपमानित करीत आहोत. अधिक स्पष्टवक्तेपणा हा राजकारणात घातक असतो, असे गिरीश बापट मला सांगायचे. पण कधी कधी इलाज नसतो.’’